एमआयडीसी गुन्हे शाखेची भरीव कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) – स्वामी पॉलीटेक या कंपनीत २० लाख ६८ हजार ७४० रुपयांची धाडसी चोरी करून फरार असलेल्या संशयित आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बोदवड येथील जंगलामध्ये जाऊन मुसक्या आवळल्या. सदर गुन्हा घडल्यावर ७२ तासात आरोपीला गजाआड करण्यात आले आहे.
एमआयडीसीमधील सेक्टर व्ही.-२३ येथील स्वामी पॉलीटेक कंपनीमध्ये संचालक वासुदेव पमनानी यांचा कॅबिनमध्ये घुसून कपाटाचे लॉक तोडून कापडी पिशवीत असलेले. १२ लाख ६८ हजार रुपये चोरी करून तसेच कंपनी मालक भरत मंधान यांच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले ८ लाख ७४० रुपये असे एकूण २० लाख ६८ हजार ७४० रुपयांची चोरून नेले म्हणून एमआयडीसी पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. घटनास्थळी श्वान पथकाने श्रद्धा पॉलीमार पर्यंत मार्ग दाखवला होता. तसेच संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पोलीस नाईक इम्रान अली सय्यद यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर संशयित हा अरविंद अरुण वाघोदे (वय-२२ वर्ष) रा. कोल्ही गोलाद, लिहा बुद्रुक, ता. मोताळा, जि. बुलढाणा, ह.मु. कृष्णा नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्याचा शोध सुरूच होता. रविवारी ४ ऑक्टोबर रोजी बोदवड परिसरातील जंगलात संशयित अरविंद वाघोदे लपून बसल्याची माहिती मिळताच एमआयडीसी गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले होते. संशयित आरोपी हा बोदवड जवळच्या जंगलातील विहिरीच्या आडोशाला लपून बसला होता. या संशयितास मध्यरात्री २. ३० वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता त्यात चोरीस गेलेल्या मुढेमालापैकी ९ लाख, ८ हजार, ३०० रुपये मिळून आले होते. ते जप्त करण्यात आले आहे. अरविंद वाघोदे यास अटक करण्यात आली. कारवाई वेळी फिर्यादी भरत मंधान यांचा भाऊ सागर मंधान हे देखील उपस्थित होते. संशयित वाघोदे याला सोमवारी न्यायमूर्ती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता. त्याला ८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गुन्हा ७२ तासात उघडकीस आला असून संशयित वाघोदेकडून ११ लाख, ५० हजार ६४० रुपये जप्त करणे बाकी आहे. कारवाई करणाऱ्या पथकात सफौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, इम्रान सय्यद,मुदस्सर काझी, सचिन पाटील, सतीश गर्जे यांचा समावेश होता, तपास सपोनि अमोल मोरे व पोहेकॉ. रतिलाल पवार करीत आहे.