शेळावे ता पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा शहरातील युवा उद्योजक मनोज कौतिकराव पाटील यांनी धाबे, ता. पारोळा या आदिवासी गावात सहा बाक, बोर्ड, पुस्तक रॅक , पायाच्या दाबाने चालणारे सॅनिटायझेशन यंत्रासह पेपर व पुस्तके उपलब्ध करून देवुन शाळेकडुन देशभरातील पहिला मुक्त , मोफत , विनाखर्च, विना शुल्क वाचन कट्टा निर्माण करून विद्यार्थी व ग्रामस्थांना ज्ञार्नाजनाची उत्तम सुविधा निर्माण केली आहे .
जि.प.प्राथमिक शाळेचे राज्य शिक्षक तथा मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील हे सतत नवनवीन उपक्रम शाळे व गावासाठी राबवित असतात. त्यासाठी ते स्वतः सह मोठ्या प्रमाणात लोक सहभागही मिळवितात.



शाळेत वाचन कोपरा असतो. त्या ठिकाणी अवांतर वाचनाची पुस्तके असतात. शाळा शिक्षकांनी फक्त यावरच परंपरागत अवलंबुन न राहता विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसाठीही अशी वाचनासाठी व त्यातुन ज्ञानवर्धन होण्यासाठी काही तरी नवीन करण्याचे ठरले . यातुन वाचन कट्टा ही संकल्पना पुढे आली . याबाबत मग शाळेचे मुख्याध्यापक साळुंखे यांनी पारोळा शहरातील दानशूर व्यक्तिमत्व व युवा उद्योजक मनोज कौतिकराव पाटील यांच्या समोर हा स्तुत्य उपक्रम मांडला . त्याला त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत लागेल तेवढी आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शविली व आज संपुर्ण देशभरातील एखाद्या शाळेकडुन विद्यार्थी व नागरिक यांच्यासाठी उपयुक्त ठरणारा , मुक्त, मोफत, विना शुल्क , विना खर्च येणाऱ्या वाचन कट्टा उपक्रमाचे उद्धघाटन ज्येष्ठ नागरिक मोहन फकिरा भिल यांच्या हस्ते कोरोना बाबत सर्व काळजी व नियम पाळुन झाले .
याठिकाणी सुंदर बैठक व्यवस्थे बरोबरच वृत्तपत्र व वाचनीय ज्ञानवर्धक पुस्तके सदैव उपलब्ध राहणार आहेत.सध्या कोरोनाच्या धरतीवर येथे पायाच्या दाबाने चालणारे हॅन्ड सॅनिटायझर यंत्र , दिवसातुन तीन वेळा बाक सॅनेटाईज व फिजिकल डिस्टन पाळत आळीपाळीने वाचनाचा लाभ व आनंद घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे .
यावेळी मुख्याध्यापक साळुंखे यांनी दाते मनोज पाटील यांचे कौतुक व अभिनंदन करून आभार मानले . विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी काळजीपूर्वक या वाचन कट्टाचा वापर करून त्याचा लाभ घेण्याची विनंती केली .
या प्रसंगी ग्राम पंचायत सदस्य अशोक भिल , शाळा व्यवस्थापन अध्यक्ष युवराज भिल , आदिवासी रक्षक समिती महाराष्ट्र राज्याचे तालुकाध्यक्ष रविंद्र भिल , कपिल सदाशिव चौधरी पारोळा तालुकाध्यक्ष शिव छावा संघटना , भागवत आधार चौधरी, सुरेश वना चौधरी, चित्रा पाटील, सिद्धराज साळुंखे यांच्यासह जाणकार ग्रामस्थ शारिरीक अंतर नियम पाळत उपस्थित होते . शेळावे केंद्र प्रमुख बी आर पारधी यांनी शुभेच्छासह अभिनंदन केले आहे .







