जळगाव (प्रतिनिधी) – येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांचे १२ ऑक्टोबर पासून विद्यापीठाकडून पुनर्नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या परीक्षांवर पुन्हा एकदा विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या बेमुदत बंद आंदोलनाची टांगती तलवार असून यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी सर्रास जीवघेणा खेळ सुरु झाला आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या आणि अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याबाबत राज्य सरकार अनुकूल नव्हते. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये परीक्षा घेण्याचे नियोजन राज्यभरातील विद्यापीठामध्ये करण्यात आले. १ ऑक्टोबर पासून परीक्षा राज्यभरात ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर नियोजन झाले होते. यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यभर चार विद्यापीठांमध्ये प्रत्यक्ष जाऊन दौरे केले. परीक्षांचा नियोजनाचा आढावा घेतला. विद्यापीठ व महाविद्यालयांची परीक्षा घेण्याबाबत मानसिकता व तयारी देखील झाली होती.
मात्र, ऐनवेळी विद्यापीठ व महाविद्यालयीन अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने राज्यभर लेखणीसह औजारबंद आंदोलन २४ सप्टेंबर पासून सुरु केले. सुमारे ७ दिवस शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याने त्यांच्याशी चर्चा केली नाही, त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे दोन्ही संचालक तसेच शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार काही मागण्या मान्य करून इतर मागण्यां लवकरच पूर्ण करून असे आश्वासन शिक्षणमंत्री सामंत यांनी संघटनेला गुरुवारी दिले.
जर मागण्याबाबत कार्यवाही झाली नाही तर पुन्हा १९ पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचं इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. बी.पी. पाटील यांनी, १२ ऑक्टोबरपासून परीक्षांचे पुनर्नियोजन शक्रवारी २ ऑक्टोबर रोजी केले असल्याची माहिती दिली. मात्र, कर्मचारी संघटनेच्या मागण्यांवर कुठलीही कार्यवाही जर झाली नाही आणि त्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला, तर विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन पुन्हा कोलमडून विद्यापीठाचे नुकसानच होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी सर्रास जीवघेणा खेळ सुरु आहे. मार्चपासून परीक्षांच्या नियोजनामध्ये आणि मानसिकतेमध्ये असणारे विद्यार्थी अद्यापही परीक्षा न झाल्यामुळे संभ्रमात पडले आहे. दरम्यान परीक्षेसाठी ५३ हजार विद्यार्थी प्रविष्ट असून ३० हजार विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट दिलेले आहे.







