जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या व लाल बहादुर शास्त्री यांच्या 116 व्या जयंती निमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ऑनलाईन महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, संचालिका ज्योती जैन, अंबिका जैन, गिता धर्मपाल, डॉ. जॉन चेल्लादूराई प्रत्यक्ष हजर होते. तर महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी, ज्येष्ठ गांधीयन डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आले. दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. ऑनलाईन पद्धतीने गांधी विचार आजच्या कठिण काळातही किती महत्त्वपूर्ण आहेत हे डॉ. अनिल काकोडकर, तुषार गांधी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, अशोक जैन यांनी विशद केले. ज्योती जैन यांनी विश्व अहिंसा दिनानिमित्त उपस्थितांना अहिंसेचे प्रतिज्ञा दिली. गांधी तीर्थ लवकरच व्हर्चुअल होत आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्हर्चुअल टूर साठी टिझर लॉंच करण्यात आला. आश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले.

महात्मा गांधीजींच्या ग्रामस्वराज्यावर भर देणारे विचार आजही शाश्वत आहे. महात्मा गांधीजींच्या विचार व संस्कारांवर चालले तर एक स्वस्थ व संतुलीत भारत घडविता येईल यासाठी गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर चालणे महत्त्वाचे आहे असा संदेश डॉ. अनिल काकोडकर यांनी दिला.
महात्मा गांधीजींनी येरवडा तुरंगाला मंदीर म्हटले कारण त्याठिकाणी राहून बंदीवासातील वेळेचा उपयोग त्यांनी ज्ञानात भर घालण्यासाठी केला. एकांतवास म्हणजे स्वतला जागृत करणे अशी त्यांची धारणा होती. लिखाण, वाचनासह जे जे चांगले करता येईल याचा विचार केला त्यामुळेच चांगले जगता आले. सध्या कोव्हीडमुळे आयसोलेशन व्हावे लागते परंतू महात्मा गांधीजींच्या एकांतवासाच्या विचारांतून प्रेरणा घेतली तर स्वस्थ भारत घडू शकतो असा संदेश महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी दिला.
‘महात्मा गांधी यांच्या तत्त्वांवर आधारित भवरलालजी जैन यांची विचार सृष्टी’ या विषयावर ज्येष्ठ गांधीयन डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सध्याची परिस्थीती कठिण असली तरी हिम्मत आणि धैर्याने काम केले तर यावर मात करता येईल. अनेक कठिण काळात महात्मा गांधीजींचे मुल्य जपणे म्हणजे साधारण कार्यातून सामाजिक दायित्वासह असाधारण कार्य करणे होय. हे कार्य भवरलालजी जैन यांनी केले.
महात्मा गांधीजींचे विचार शाश्वत- अशोक जैन
प्रासंगिक संदेश देताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन म्हणाले की, बदलत्या जीवनशैली व सद्यपरिस्थितही महात्मा गांधीजींचे विचार शाश्वत आहेत. संकटाची परिस्थिती आहे मात्र हताश, निराश न होता नैतिक मुल्ये जपत सामाजिक दायित्वाची जबाबदारी घेत पुढे चालत राहणे म्हणजे गांधी विचारांवर मार्गक्रम करणे. हा प्रयत्न वडिल भवरलालजी जैन यांनी केला. तोच प्रयत्न जैन परिवार करित आहे. गांधी विचारातुनच देशातील उत्पादकांचा भूमिपुत्रांना लाभ व्हावा यासाठीच जैन इरिगेशन प्रयत्न करित असल्याचे अशोक जैन म्हणाले.
महात्मा गांधी जयंती ला चरखा जयंती म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनच्या प्रांगणात दिवसभर अखंड सूतकताई करण्यात आली. यामध्ये फाउंडेशनचे सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.







