मुंबई (वृत्तसंस्था)- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेने देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. बलात्कार पीडितेचा मृतदेह कुटुंबीयांकडे न सोपवता उत्तर प्रदेश पोलिसांनी अंतिम संस्कार उरकत पीडितेवर बलात्कार झालाच नाही असं सांगितल्याने प्रकरण आणखीनच तापलं आहे.
अशातच काल पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले होते.आता या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
याबाबत आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर एक संदेश लिहिला असून यामध्ये त्यांनी मुंबई व महाराष्ट्रावर चिखल फेक करणाऱ्यांना उत्तर प्रदेशातील घटनेबाबत काही बोलणार की नाही? असा जाब विचारला आहे.
ते लिहितात,’उत्तरप्रदेशात मीडियाला रोखून आणि पीडित कुटुंबाला डांबून उत्तर प्रदेश सरकार दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करतंय! यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही?आणखी किती दिवस गप्प बसणार?की त्यांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीय?’
आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख अभिनेत्री कंगना राणावत तिच्याकडे असल्याचं दिसतंय. कंगनाने गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई व महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावेळी तिने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर चौफेर टीका झाली होती. अशातच आता रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या कंगनाला टोला लगावत तिने महाराष्ट्र सरकार विरोधात घेतलेल्या भूमिके मागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.