येवला (शहर प्रतिनिधी) – शासनाची शिक्षकांप्रति असलेली उदासीनता २० वर्षांपासून अजूनही कायम असल्याचे आढळुन आल्याने महा. राज्य उच्चमाध्यमिक शाळा / कमवी कृती संघटनेच्या वतीने आजपासून येवला ते संगमनेर अशी पायी दिंडी काढण्याची वेळ उच्चमाध्यमिक शिक्षकांवर आली आहे, या पायी दिंडीच्या माध्यमातून उदासीन शासनाला जागे करण्याचा प्रयत्न आहे तसेच अनुदानासाठी नेमण्यात आलेल्या अनुदान समितीचे अध्यक्ष मा. ना. बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन त्यांच्या घरासमोर ठिय्या मांडण्याचा निर्णय राज्य पदाधिकारी यांनी घेतला असून या मार्फत अनुदानासाठी सरकारला मागणी करण्यात येणार आहे.
या पायी दिंडीची सुरवात आज दुपारी येवला येथून सुरू झाली असून या दिंडी आंदोलनास मा. आमदार किशोर दराडे यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे व स्वतः दिंडीत पायी येण्याची माहिती दिली आहे, त्यांच्या सोबत जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार येथील सर्व शिक्षक व पदाधिकारी सहभागी आहे. याचे नेतृत्व संघटनेचे राज्य सचीव श्री अनिल परदेशी करत असून नाशिक विभागातील पदाधिकारी श्री दिनेश पाटील, श्री गुलाब साळुंख, श्री कर्तारसिंग ठाकूर, श्री महेंद्र बच्छाव, श्री प्रकाश तायडे, श्री सुरेश कापुरे,श्री संदीप बाविस्कर, श्री निलेश गांगुर्डे, श्री विंचू सर हे सक्रिय सहभागी आहेत, जर सरकारने लवकर अनुदानाचा निर्णय न दिल्यास याचा पडसाद पूर्ण राज्यभर दिसून येईल व याची तिव्रता अतिशय जास्त राहील व याला पूर्णतः शासन जबाबदार राहील त्याच प्रमाणे शिक्षकांच्या असंतोषाचा परिणाम लवकरच होऊ घातलेल्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या आमदार निवडणुकीवर दाखवून देऊ अशी माहिती संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख श्री पराग पाटील यांनी दिली.








