श्री जैन युवा फाउंडेशन,रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स व इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – येथील श्री जैन युवा फाऊंडेशन आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शाकाहार दिनानिमित्ताने आज दि. 1 ऑक्टोबर रोजी अनेक ऑनलाईन शाळेत शाकाहाराचा प्रचार प्रसार करणारे व्हिडीओ दाखविले जाणार आहे. तसेच सकाळी 10 ते 5 या वेळेत प्लाझ्मा दान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली व खुले मांस विक्री थांबवावी अशी विनंतीदेखील केली आहे.
जागतिक शाकाहार दिनानिमित्त दरवर्षी श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स याच्या सहकार्यने शाकाहार समर्थन रॅली काढण्यात येते. यंदा करोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर रॅली न काढता व्हिडीओ विविध ऑनलाईन शाळेत, क्लासेस मध्ये दाखविले जाणार आहेत. या व्हिडीओमध्ये युवाचार्य श्री महेंद्रऋषि महाराज आणि शाकाहार प्रणेता रतनलाल बाफना हे शाकाहार – उत्तम आहार याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहे.
प्लाझ्मा दान महाशिबिरासाठी 32 दात्यांनी नोंदणी केली आहे. सकाळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. या शिबिरासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी प्लाझ्मा दान करण्याबाबत आवाहन केले आहे. श्री जैन युवा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. प्रसंगी खुले मांस विक्री थांबवावी याविषयी विनंती पत्र दिले. याबाबत जिल्हाधिकारी राऊत यांनी अनुकूलता दर्शवित खुले मांस विक्री थांबविण्याच्या सूचना देणार असल्याची माहिती दिली.
ज्या व्यक्तींना प्लाझ्मा दान करावयाचा आहे, अशा सुदृढ नागरिकांनी सकाळी 10 वाजता इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कार्यालयात यावे, असे आवाहन अध्यक्ष जयेश ललवाणी, सचिव रितेश पगरिया, कोषाध्यक्ष अमोल फुलफगर यांनी केले आहे.