जळगाव (प्रतिनिधी) – : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी दि. २८ रोजी, सदस्यांचे कामे होत का नाहीत असा प्रश्न पोपट भोळे यांनी उपस्थित करून तसेच जि.प. अध्यक्ष हे रावेरचे असल्याने पंचायत समितीतील रिक्त जागा कधी भरले जातील ? असे विचारत सभापती जितेंद पाटील यांनी रावेर तालुका उजाड झाला आहे असे सांगत भाजपाला घरचा आहेर दिला. सभेत बदल्यांवरून सत्ताधारी विरोधी सदस्यांनी आवाज उठविला.
सभेत अध्यक्ष रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, महिला बालकल्याण सभापती ज्योती पाटील, कृषी सभापती उज्जवला म्हाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, अतिरिक्त सीईओ विनोद गायकवाड, उप सीईओ कमलाकर रणदिवे यांच्यासह सदस्य, अधिकारी, सभापती उपस्थित होते.
रावेर पंचायत समितीत कनिष्ठ व वरिष्ठ सहाय्यक यांच्या रिक्त जागा कधी भरतील असा सवाल पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील यांनी विचारला. प्रशासनाकडून संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्यावर रिक्त जागा भरल्या जातील असे उत्तर दिल्याने संतप्त सभापती पाटील यांनी आमचा कार्यकाळ संपल्यावर जागा भरल्या जातील काय असा प्रतिसवाल केला. त्यावर काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी हास्यविनोद करीत, जि.प. अध्यक्ष हे रावेरचे असल्याने सदर रिक्त जागा नक्कीच भरले जातील असे सांगितले. त्यावर सभापती जितेंद पाटील यांनी रावेर तालुका उजाड झाला आहे असे सांगत भाजपाला घरचा आहेर दिला. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून शालेय पोषण आहारबाबत चौकशी करण्याची मागणी देखील पाटील यांनी केली होती त्याचे काय झाले या प्रश्नाचे उत्तर प्रशासन देऊ शकला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा अशी मागणी त्यांनी केली. सभापतींचे ऐकून घेतले जात नाही. हे प्रकरण दाबले जात आहे का असा आरोपहि जितेंद्र पाटील यांनी केला.
जि .प.तील काही विभागात चुकीच्या बदल्या झाल्या आहेत असा आरोप सदस्य पोपट भोळे यांनी केला. सदस्यांचे कामे होत का नाहीत असा प्रश्न उपस्थित करून सत्ताधारी भाजपाला भोळे यांनी घरचा आहेर दिला. बदल्यांवरून सत्ताधारी विरोधी सदस्यांनी आवाज उठविला. ज्यांना बदल्या आवश्यक आहे त्यांना मात्र का बदली दिली नाही ? अनावश्यक बदल्या जिल्हा परिषदेंने का केल्या यावरून पोपट भोळे, पल्लवी सावकारे, नाना महाजन, प्रभाकर सोनवणे आदींनी प्रशासनाला धारेवर धरले. या प्रकरणाची चौकशी केली जाईल अशी सारवासारव प्रशासनाकडून करण्यात आली.