असोदा येथील घटना , चालक फरार
जळगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील आसोदा येथे गजबजलेल्या बसस्थानक परिसरात पाण्याच्या भरलेल्या टँकरने पायी चालणाऱ्या इसमास धडक दिल्याने तो टँकरच्या मागच्या चाकात आला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाआहे.
दरम्यान यावेळी मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता.
सध्या करोनाची साथ सुरु आहे. यासाठी असोदा गावतही काळजी घेतली जात आहे. अशावेळी धनराज जनार्दन सरोदे यांच्या मालकीचे उदय वाँटर सप्लायर्सचे पाण्याचे टँकर गावात पाणी पोहोचविण्यासाठी आलेले होते. दरम्यान, बसस्थानक परिसरात हे टँकर आले असता तेथून पायी जात असलेल्या माधव तोताराम पाटील (वय ५२) रा. ढंढोरे नगर, असोदा यांना चालकाने जोरदार धडक दिली. यात ते मागील चाकाखाली आले. त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते जागीच गतप्राण झाले. दरम्यान, यावेळी असोदा ग्रामस्थांनी एकच गर्दी केल्यानंतर चालक तेथून पसार झाला. अर्धा तास झाला तरी पोलीस न आल्यामुळे वातावरण तंग झाले होते. हे टँकर बिना क्रमांकाचे असल्याचे सागितले जात आहे.
दरम्यान , माधव पाटील हे एका हॉटेलमध्ये कारागीर होते. माधव पाटील यांच्या पश्चात पत्नी, शेत मजूर असलेला दिव्यांग मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.