जिल्ह्यात आरोग्य पथकांना 530
कोरोना बाधित रुग्ण शोधण्यात यश
जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत जळगाव जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात 3 हजार पथकांमार्फत जिल्ह्यातील 20 लाख नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या नागरीकांमधील 530 व्यक्ती या कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. या व्यक्तींचा वेळेत शोध लागल्याने जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनास निश्चितपणे यश मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान 15 सप्टेंबर, पासून सुरू केली आहे. जिल्ह्यातील नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरात 3 हजार आरोग्य पथकांची नियुक्ती केली आहे. यात महानगरपालिकेच्या 134, जिल्ह्यातील 18 नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील 337 तर जिल्हा परिषदेच्या 2533 पथकांचा समावेश आहे. या पथकात आरोग्य सेवकांसह स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व संघटनांनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे.
या पथकांमार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख 23 हजार 742 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत आतापर्यंत जिल्हाभरात 60 हजार 787 इतके कोमॉर्बिड रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 5 हजार 211 रुग्णांना उपचारासाठी, संदर्भ सेवाकरीता पाठविण्यात आले होते. यापैकी 2 हजार 730 रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी 530 रुग्ण हे कोरोना बाधित आढळून आले आहे. हे रुगण विहित वेळेत आढळून आल्याने त्यांचेवर वेळेत उपचार होणार असल्याने त्यांच्या जिविताचा धोका टळणार असून त्यांचेपासून इतरांना होणारा संसर्ग रोखण्यासही मदत होणार आहे.
आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 घरांना भेटी देत असून ही पथके घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेण्यात येत आहे. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येत आहे. तेथे कोविड 19 च्या तपासणीसाठी स्वॅब चाचणी घेण्यात येवून पुढील उपचार केले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने दोन टप्प्यात 25 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. यात पहिली फेरी 10 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून दुसरी फेरी 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असून दुसऱ्या फेरीचा कालावधी हा 10 दिवसांचा राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.