विद्यापीठाचे कामकाज कर्मचाऱ्यांअभावी झाले ठप्प
जळगाव (प्रतिनिधी) – येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी २४ पासून लेखणी व अवजार बंदसह ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. गुरुवारी आंदोलन सुरु झाल्यामुळे विद्यापीठाचे संपूर्ण कामकाज ठप्प झाल्याने अनेक प्रशासकीय कामे प्रलंबित राहिली.
विद्यापीठातील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्या याकरिता शुक्रवारी 18 रोजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. निवेदनात म्हटले होते की, शासनाच्या वित्त विभागाच्या दोन निर्णयातील सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेच्या तरतुदी लागू केल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे रद्द केलेले शासन निर्णय पूर्वलक्षी पूर्वप्रभावाने पुनर्जीवित करावेत. आकृषी विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग सर्व लाभासह लागू झाला पाहिजे. या दोन मागण्यांची पूर्तता होत नसल्याने त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी लेखणी, अवजार बंदसह ठिय्या आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते. उदय सामंत यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मागण्या पूर्ण करण्याचे आश्वसन दिले होते, मात्र आजवर हे आश्वासन हवेत विरले.
गुरुवारी संघटनेने केलेल्या आंदोलनात ३९५ शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. तीस सप्टेंबरपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर, १ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेचे सचिव रमेश शिंदे यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निष्क्रिय व आडमुठ्या धोरणाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
कृती समितीचे जयंत सोनवणे, अरूण सपकाळे, अजमल जाधव, विकास बिऱ्हाडे, सुभाष पवार, सुनील आढाव, वसंत वळवी, राजू सोनवणे, चंद्रकांत वानखेडे, सुनील सपकाळे, सविता सोनकांबळे, रमेश शिंदे, शांताराम पाटील, पद्माकर कोठावदे, अरविंद गिरणारे, मृणालिनी चव्हाण, प्रमोद चव्हाण, दुर्योधन साळुंखे, महेश पाटील, शिवाजी पाटील आदी आंदोलन यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.