शेळावे (ता. पारोळा) – कोरोना संकट व लॉक डाऊन काळात सोशल मिडीयाचा वापर व महत्व वाढले . त्याचा योग्य वापर झाला तर सकारात्मक बाबी घडून येतात. याचाच प्रत्यय जि. प. प्राथ शाळा धाबे ता पारोळा येथे आला. शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी हिवरखेडे बु. ता. पारोळा येथिल ४५ आदिवासी बालकांना मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम घेतला. त्याची चित्रफीत पारोळा शहरातील युवा उद्योजक सुधाकर पाटील ( महाळपुर ) यांनी व्हॉटसअपला बघितली. लगेच त्यांनी मुख्याध्यापक साळुंखे यांच्याशी संपर्क करून स्व खर्चाने धाबे ता. पारोळा येथिल ६० आदिवासी बालकांना गणवेश देण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार त्यांच्या पत्नी माजी उपनगराध्यक्षा व नगरसेविका वर्षा सुधाकर पाटील यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.

यावेळी वर्षा पाटील म्हणाल्या की, गरीब आदिवासी बालकांना गणवेश प्राप्त झाल्यावर झालेला आनंद बघुन लाख मोलाचे समाधान मिळाले . माझा परिवार सतत अशा सामाजाच्या सेवेसाठी तयार आहे. या कार्यक्रमाला वैशाली पाटील , चित्रा पाटील , सिद्धराज साळुंखे , प्रसाद महाजन , सुप्रभा साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले . या उपक्रमाचे शेळावे केंद्र प्रमुख बी आर पारधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी कौतुक केले .







