पोलीस दलाच्या स्थापनेपासून ते कोरोनाच्या अगोदर पोलिसांना कर्तव्य बजावताना कधीच त्यांच्या मनामध्ये भीतीचा लवलेश सुद्धा नव्हता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र, भीती पोलिसांमध्येही निर्माण झाली होती. मार्च- एप्रिल महिन्यामध्ये कोरोना बद्दल जनमानसात जी प्रचंड भीती होती त्याला पोलीस ही अपवाद नव्हते.तरीही पोलीस या महामारीला मोठ्या धैर्याने सामोरी गेली. विशेष म्हणजे कोणतेही प्रशिक्षण नसताना. याच पार्श्वभूमीवर 21 एप्रिलला आमची देखील प्रत्यक्ष कोरोना कक्षात गार्डड्युटी लावण्यात आली. या अगोदर आम्ही कोरोना पासून प्रचंड काळजी घेत होतो. साधा किराणा जरी आणायचा झाला तर त्यातील बिस्कीटचे पुढे सुद्धा आम्ही सॅनेटाइज करून घेत होतो, दुधाची पिशवी साबणाच्या पाण्याने धुऊन घेत होतो. परंतु प्रत्यक्ष कोरोना कक्षात ड्युटी लागल्यामुळे आमच्या मनात भीती निर्माण झाली होती. स्वतःविषयी नाही तर कुटुंबाबद्दल यापुढे 19 वर्षाच्या सेवेत अनेक जोखमीच्या ठिकाणी आम्ही काम केले होते, दंगलीच्या ठिकाणी सहकार्यांसोबत थेट मध्ये घुसून समाजकंटकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. परंतु तेव्हा आपण जखमी जरी झालो, किंवा आपला कर्तव्य बजावताना आपला जीव जरी गेला तरी तो फक्त आपल्या पुरता मर्यादित राहत होता. परंतु कोरोनाचा मृत्यु हा काही आपल्या पुरता मर्यादित राहत नसून तो आपल्या आप्तस्वकीयांना आपल्या कवेत घेत असतो या कल्पनेने आम्ही अक्षरशः भेदरून गेलो होतो. तरीदेखील आमच्यासाठी देश महत्त्वाचा होता.कर्तव्य महत्त्वाचे होते. परंतु आमच्या एकोणीस वर्षाच्या सेवेमध्ये कर्तव्य पार पाडत असताना इतकी भीती कधीही आम्हाला वाटली नव्हती ते एप्रिल महिन्यामध्ये कोरोना कक्षाची गार्डड्युटी करताना वाटली, म्हणूनच आमच्या वेदनेचं आणि भावनेचे लिखाण करून आम्ही “मृत्यू घराचा पहारा” हे पुस्तक लिहून काढले आणि आमच्या भावनेला वाट मोकळी करून दिली. परंतु बऱ्याच वेळेला आम्हाला असा प्रश्न विचारला जातो की कोरोना कक्षामध्ये रुग्णांवर उपचार केले जातात. म्हणजेच तिथे जीवन दिले जाते मग तुम्ही त्या कक्षाला मृत्यूचे घर कसे म्हणू शकतात. आम्ही अत्यंत नम्रपणे अशा व्यक्तींना सांगतो की, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. परंतु आम्ही वर सांगितल्याप्रमाणे कुटुंबियाच्या प्रेमाखातर आम्ही प्रचंड काळजी घेत होतो. परंतु ज्या घरांमध्ये(कक्षामध्ये) कोरोना पेशंटवर उपचार होतात,म्हणजे कोरोना या विषाणूचे प्रत्यक्ष तिथे वास्तव्य होते त्या क्षणाला आमच्या मनामध्ये असेच येत होते की, या घरांमध्ये (कक्षामध्ये) कोरोनारुपी राक्षस राहतो की काय? म्हणजेच प्रत्यक्ष मृत्यु राहतो की काय? आणि त्याच् मृत्यू घराचा पहारा आपण तर करीत नाही ना? हीच भावना आमच्या मनामध्ये येत होती आणि या कल्पनेने आम्ही अक्षरशः भेदरून गेलो होतो आणि त्याच वेदनेतून या पुस्तकाचा जन्म झाला. परिणामी “मृत्यू घराचा पहारा” या शीर्षकाचा जन्म झाला.या तीन महिन्याच्या काळात कर्तव्य बजावताना आमच्या असे निरीक्षणात आले की एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात होता आणि नागरिकांमध्ये कोरोनाची प्रचंड दहशत होती, भीती होती.परंतु परंतु आजच्या घडीला कोरोणाचे रुग्ण संख्या वाढत असताना नागरिक ज्या पद्धतीने एप्रिल-मे मध्ये काळजी घेत होते आज मात्र (काही अपवाद वगळता) नागरिक काळजी घेताना आम्हाला दिसत नाही.आमची विनंती असेल की जोपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस येत नाही तोपर्यंत आपण सतर्क राहून आपली आणि आपल्या कुटुंबाचा कोरोना पासून बचाव केला पाहिजे. आम्ही ज्या दिवसापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच एप्रिल महिन्यापासून कर्तव्य पार पाडतो आहोत ते आजपावेतो आम्ही कोरोना पासून बचावासाठी घेत असलेली सुरक्षा त्यामध्ये पावेतो कुठलीही तडजोड केली नाही. कदाचित म्हणूनच कोरोना आमच्या सुरक्षेला आज पावेतो भेदू शकलेला नाही. म्हणून आमची नागरिकांना विनंती आहे की, आपण देखील काळजी घ्यावी आपल्या सुरक्षेसाठी प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी, शासन – प्रशासन, महाराष्ट्र पोलीस हे कायमच तत्पर असेल. मग ते निसर्ग चक्रीवादळ असो की कोरोनाची महामारी असो प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाऊन भारत माता आणि या महाराष्ट्र देवतेची सुरक्षा करेल.

जय हिंद जय महाराष्ट्र
पो.ना. विनोद पितांबर अहिरे जळगाव
9823136399







