नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – नवे कृषी विधेयक तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी करून त्यासाठी मोदी सरकारविरोधात होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व शिरोमणी अकाली दल करेल, असे पक्षाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी शनिवारी स्पष्ट केले.
आम्ही आता पंजाबमध्ये जाऊ. तेथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊ. शिरोमणी अकाली दल हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. त्यामुळे मोदी सरकारला विरोध करणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व आम्ही करू, असे बादल म्हणाले.
बादल यांच्या पत्नी हरसिम्रत कौर बादल यांनी या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिरोमणी अकाली दलाने जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक, कृषी उत्पादन व्यापार आणि वाणीज्य (प्रोत्साहन आणि सवलत) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवांबाबत शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) करार विधेयकाविरोधात मतदान केले आहे.
अमृतसरमध्ये निदर्शने
अमृतसरमध्ये शेतकऱ्यांनी निदर्शने केली. त्यांनी मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. हे विधेयक शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने ते मंजूर झाल्यास आम्ही ते उद्ध्वस्त करू. त्या पाठोपाठ आम्ही बाजार समितीही बंद पाडू, असा इशारा शेतकरी नेते गुरबचनसिंग चब्बा यांनी दिला आहे.