गुढे.ता.भडगांव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद जळगाव प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी चाळीसगाव तालुक्यातून जि.प.उच्च प्राथमिक शाळा शिंदी येथील उपशिक्षक गोरख मोतीराम वाघ यांना जाहीर झाला असून लवकरच जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.वाघ हे तंत्रस्नेही , उपक्रमशील शिक्षक असून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत त्यांची सेवा झालेल्या शाळांना ‘अ’ दर्जा मिळवून देण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे , तालुक्यातील रोहिणी , शिवापूर , शिंदी तसेच भडगाव तालुक्यातील गोंडगाव या शाळेत त्यांनी आपल्या उपकर्मशीलतेने विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी ओळख मिळवलेली आहे , विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी साह्यभूत डिजिटल शाळा उपक्रम त्यांनी प्रत्येकच शाळा राबवलेला असून या सर्व शाळेत ई – लर्निंगचे धडे विद्यार्थी गिरवत आहेत.त्यांनी राबविलेल्या लोकसहभाग अभियानातून शाळांना लाखो रुपयांच्या देणग्या प्राप्त झालेल्या आहेत ,या आर्थिक मदतीतून शालेय रंगकाम, एल इ डी संच, म्युझिक सिस्टम, ठिबक सिंचनसह वृक्षारोपण , संगणक प्रिंटर पंखे, लेखन- वाचन साहित्य आदि गोष्टींची खरेदी केलेली आहे , त्यातून विद्यार्थ्यांचे शिकणे सोपे झाले असून , विद्यार्थी उपस्थितीत व संख्येत वाढ झालेली आहे ,५वी पर्यंत असलेल्या शाळा ८ वी पर्यंत वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. चाळीसगाव तालुक्यात राबवल्या गेलेल्या डिजिटल शाळा प्रेरणासभा अभियानातही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावून इतर शाळांनाही लाखो रुपयांचा निधी मिळवून देण्याचे काम .वाघ यांनी केलेले आहे.
शालेय अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने शैक्षणिक सहली , जंगल सफर , वनभोजन , संगीत परिपाठ ,क्रीडास्पर्धा, टाकाऊतुन टिकाऊ वस्तुनिर्मिती , सांस्कृतिक कार्यक्रम असे सहशालेय उपक्रम ते नेहमी राबवत असतात.
श्री.वाघ यांनी राष्ट्रीय , राज्य , विभाग व जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सहभाग नोंदवला असून काही प्रशिक्षणातून त्यांनी तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका बजवलेली आहे. संगणक युगात विद्यार्थ्यांना फक्त खडू फळ्याचा वापर करून अध्यापन करणे पुरेसे नसून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आपल्या अध्यापनास देणे गरजेचे आहे , ही गरज ओळखून श्री.वाघ यांनी ‘शिक्षणक्रांती’ नावाची शैक्षणिक वेबसाईटची निर्मिती केलेली आहे , आतापर्यंत जगभरातून १६ लाख व्हिजिटर्स असलेल्या या वेब साईटवरून अध्ययन-अध्यपनाचे साहित्य , व्हिडिओ उपलब्ध करून दिले जातात, ही वेबसाईट पूर्णपणे मोफत असून www.shikshankranti.blogspot.com या लिकवर भेट देऊन लाभ घेण्याचे आवाहन श्री.वाघ करतात. शिक्षणक्रांती नावाच्या You-tube channel चीही निर्मिती श्री.वाघ यांनी केलेली असून यावरही शैक्षणिक व्हिडीओज अपलोड केले जातात.
शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गोरख वाघ यांची जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याने सर्व थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.चाळीसगाव तालुका गटशिक्षणाधिकारी.विलास भोई , केंद्रप्रमुख.जाटीया, मुख्याध्यापक व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त लक्ष्मण चव्हाण व तालुक्यातील आदर्श काम करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींच्या कामातून आपल्याला काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे व हा पुरस्कार माझा नसून , या सर्वांचा असल्याचे श्री.वाघ यांनी सांगितले.








