जळगाव (प्रतिनिधी) – घरगुती जेवणाचे डबे पुरवणाऱ्या जळगावातील एका व्यावसायिकाला बिहारमधील काही भामट्यांनी साडेतीन लाख रुपयात गंडवले आहे. सेवाभावी संस्थेत पैसे गुंतवल्यानंतर ३ महिन्यात ते दामदुप्पट करण्याचे आमिष या भामट्यांनी व्यावसायिकाला दिले होते. धक्कादायक बाब म्हणजे, पैसे घेऊन संबंधित इच्छुक व्यावसायिकाला बिहारमध्ये बोलावण्यात आले होते. पैसे घेऊन व्यावसायिक त्याच्या आईसह बिहार राज्यातील मुजफ्फरपूरला गेल्यानंतर भामट्यांनी त्याच्याकडून पैशांची बॅग हिसकावून पोबारा केला. ही घटना गेल्या अाठवड्यात मुजफ्फरपूरला घडली.
कुसुंबा येथील मनोज शोभाराम भाटी (वय ३७) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. हा सारा प्रकार गेल्या आठवड्यात बिहार राज्यातील मुजफ्फरपूर, पटना याठिकाणी घडला आहे. या घटनेसंदर्भात मनोज याने सांगितलेली हकीकत अशी की, मनोज याचे दीड वर्षांपूर्वी बिहार राज्यातील एका तरुणीसोबत लग्न झालेले होते; मात्र लग्नानंतर संबंधित तरुणीने त्याची फसवणूक केली. ती पळून गेली होती. लग्नात मनोजची ओळख बिहारमध्ये उत्क्रमित विद्यालयात शिक्षक असलेल्या भीमराज सिंह नावाच्या व्यक्तीसोबत झाली होती. लग्नानंतर भीमराज सिंह हा मनोजच्या संपर्कात होता. त्याने दीड महिन्यांपूर्वी मनोजचा विश्वासात घेत आर्थिक लाभाची एक योजना सांगितली होती. पटना येथे सेवा सदन नावाची आमची एक सेवाभावी संस्था असून, ही संस्था गोरगरिबांच्या हितासाठी काम करते. या संस्थेमार्फत एका प्रकल्पात पैसे गुंतवले की ३ महिन्यात गुंतवणूकदाराला गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दामदुप्पट मोबदला परत मिळतो. विशेष म्हणजे, गुंतवणूकदाराला त्याच्या पैशांची खात्री म्हणून व्यवसायासाठी पेपर कप बनवण्याचे मशीन दिले जाते. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर दाम दुप्पट रक्कम आणि ही मशीन गुंतवणूकदाराला मिळते. हीच मशीन दिल्ली, आग्रा याठिकाणी १२ ते १५ लाख रुपयांची मिळते. त्यामुळे या योजनेत सहभागी व्हायला हरकत नाही, असे आमिष भीमराज सिंह याने मनोजला दिले होते. यावर विश्वास ठेऊन मनोज आमिषाला बळी पडला हाेता.
मनोज याेजनेत सहभागी हाेण्यास तयार झाल्यानंतर भीमराज सिंहने त्याला साडेतीन लाख रुपये घेऊन मुजफ्फरपूरला बोलावले हाेते. त्यानुसार गेल्या आठवड्यात मनोज त्याच्या आईला सोबत एक लाख रुपयांची रोकड घेऊन बिहारमध्ये गेला हाेता. ते दोघे मुजफ्फरपूरला पोहचल्यानंतर भीमराज सिंह व त्याच्या साथीदारांनी त्यांना एका हॉटेलात मुक्कामी थांबवले. या दरम्यान दोन दिवसात मनोजने त्याच्या आईच्या बँक खात्यातून एटीएममधून अडीच लाख रुपये काढले. साडेतीन लाख रुपये जमल्यानंतर मनोजने पेपर कप मशीनबाबत भीमराजला विचारणा केली. मशीन घेण्यासाठी पटना जावे लागेल, म्हणून तो मनोजला एका कारने घेऊन निघाला. वाटेत एका निर्जनस्थळी कार थांबवून मनोजकडून गाडीतील चौघांनी पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनोजने कारमधून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. गाडीतील भामट्यांनी त्याचा पाठलाग केला. त्याचवेळी रस्त्यात पोलिसांच्या वेशात दोन जण समोर आले. त्यांच्याकडे मदतीची याचना केल्यानंतर पाठलाग करणाऱ्यांना त्यांनी अडवले. ‘तुम्ही भामटे आहात, एका सर्वसामान्य व्यक्तीची तुम्ही फसवणूक करत आहात, तुम्हाला पोलिस ठाण्यात घेऊन जायचे आहे’, म्हणून ते सर्व जण एका रिक्षात बसायला लागले. तेव्हा मनोजने ‘मी पण सोबत येतो, असे सांगितल्यानंतर त्यांनी त्याला धक्का मारून पलायन केले. पोलिस वेशात असलेले दोघे पण भामट्यांचे साथीदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मनोजने स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली.
बिहारच्या स्थानिक पोलिसांनी मनोजच्या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. म्हणून मनोजने तेथील काही प्रसारमाध्यमांशी संपर्क करून अापबिती सांगितली. माध्यमांनी वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलिस जागे झाले. नंतर तक्रार नोंदवली गेली. भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मनोज व त्याची आई २ दिवसांपूर्वी जळगावात परतले. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोजसोबत घडलेल्या प्रकाराची पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. तो मुक्कामी थांबलेल्या हॉटेलातील सीसीटीव्ही फुटेज, भामट्यांचे मोबाइल कॉल डिटेल्स काढण्यात आले. त्यात संबंधित भामटे हे मनोजची लग्नाबाबत फसवणूक करणाऱ्या तरुणीच्या संपर्कात असल्याचे समोर आले अाहे.