यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील प्रा. आ. केंद्र सावखेडासिम कार्यक्षेत्रात येणाऱ्या अतिदुर्गम व सातपुड्याच्या पर्वत रांगेत बसलेले आणि राज्याच्या सीमेवर असलेले गाड्रया , जामन्या , ऊसमळी , व लंगडाआंबा या आदिवासी गावे व पाडयातही शासनाची “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम मा. गट विकास अधिकारी डॉ. निलेश पाटील , ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे व वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.


सदर मोहीमेस दि. १२ सप्टेंबर पासून प्रारंभ करण्यात आलेला आहे. परंतु दिनांक १३ रोजी या भागात मुसळधार पाऊस झाला व या सर्व गावांचा व पाड्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला. भ्रमणध्वनी ह्या भागात कधीही काम करत नसतात. अशाही परिस्थितीत आरोग्यसेवक अरविंद जाधव गाड्रया, जामन्या , ऊसमळी , व लंगडाआंबा या गावात व पाड्यावर जाऊन आशा सेविका , अंगणवाडी सेविका व प्रा. शिक्षक यांचे सहकार्याने घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची व ५० वर्षावरील व्यक्तींची तपासणी करून “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम यशस्वीपणे राबवत आहेत.







