नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – करोना व्हायरसच्या भीतीने भाजपाचे खासदार आणि माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी एकांतवासात (क्वॉरंटाइन) राहण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेश प्रभू हे १० मार्च रोजी सौदी अरेबियातील एका बैठकीत सहभाग घेऊन परतले आहेत. यामुळे त्यांनी पुढच्या 14 दिवसांसाठी त्यांनी क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरेश प्रभू सेकंड शेर्पा बैठकीसाठी सौदीला गेले होते. १० मार्चला झालेल्या बैठकीनंतर ते भारतात परतले. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात परतल्यानंतर करोना टेस्ट केल्यानंतर ती निगेटिव्ह आली. मात्र तरीही त्यांनी स्वत:ला क्वॉरंटाइन केले आहे.
दरम्यान, मंगळवारीही परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनीही स्वतःला क्वॉरंटाइन केले आहे. थिरुवअनंतपुरम येथील एका डॉक्टरच्या संपर्कात आल्यामुळे व्ही. मुरलीधरन यांनी एकांतवासात राहण्याचा निर्णय घेतला होता.