जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुसुंबा येथील एका महिलेला महापालिकेच्या आयटीआय येथील केंद्रातून अस्वस्थ वाटू लागल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले होते. तेथे महिलेला कोरोना नसल्याचे सांगत घरी नेण्यास सांगितले. मात्र, कोरोना पॉझिटीव्ह असा अहवाल असलेल्या या महिलेचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
कुसुंबा येथील एका महिलेस त्रास जाणवू लागल्याने त्यांना गुरुवारी १० रोजी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे कोरोनाची तपासणी करायला सांगितली. तपासणीमध्ये महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्यामुळे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आयटीआय येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात सांगितले. दुसऱ्या दिवशी महिलेला अत्यवस्थ वाटू लागले. आयटीआय येथील डॉक्टरांनी संदर्भ पत्र बनवून शासकीय कोविड रुग्णालयात दाखल करण्याचे सांगितले. रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. ११ रोजी सकाळी डॉक्टरांनी महिला रुग्णाचे तपासणीचे कुठलेही कागदपत्र न पाहता घशाला इन्फेकशन असल्याचे सांगून त्यामुळे तुमचा अहवाल निगेटिव्ह आहे. अशक्तपणा आहे. त्यामुळे ग्लुकोजची बिस्किटे घ्या व पाणी प्या असा सल्ला दिला, आणि घरी जाण्यास सांगितले.
दरम्यान ३ दिवसांनी सोमवारी सकाळी घरी महिलेला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. काही वेळातच महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात नेण्यात आला. तेथे डॉक्टरांनी ११ सप्टेंबर रोजी रुग्णालयात जागा नसल्याने रुग्ण दाखल करून घेतला नसेल अशी बेजवाबदारपणाची उत्तरे दिली.
या घटनेनंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्याकडे कैफियत मांडली यावेळी डॉक्टर रामानंद यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिलेत. या घटनेमुळे शासकीय रुग्णालयातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबाबत हलगर्जीपणा होत असेल तर, जिल्ह्यातील कोरोना वाढ थांबणार कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.