जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील धानोरा गावानजीक असलेल्या कांताई बंधार्यात राजेश प्रकाश चव्हाण (20) रा. धानवड ता. जि. जळगाव या तरुणाचा सेल्फी काढत असतांना पाय घसरुन पाण्यात पडल्याने बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. या तरुणाचा मृतदेह सोमवारी तब्बल ३८ तासांनी सापडला आहे.
मनपाचे आपत्कालीन पथक व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी शोधकार्य मोहीम राबविली होती. गिरणा काठावरील गावातील पोलीस पाटील व सरपंचांना पोलीसांच्या माध्यमातून सुचना देण्यात आल्या होत्या, सोमवारी खेडी शिवारात म्हसोबा मंदिराजवळील नाल्यात सदर मृतदेह तरंगत आल्याचे दिसून आला होता.
शोधकार्यकामी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पो.काँ. उमेश भांडारकर, पो.ना. संजय भालेराव, अनिल मोरे, विजय दुसाने, हरिलाल पाटील यांनी परिश्रम घेतले. मृतदेह शासकीय वैधकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास महेश महाले करीत आहेत.