नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- कोरोनामुळे देशात कठिण परिस्थिती बनली आहे. या परिस्थितीत सर्वांनी नियमांचे पालन करत काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनावर जोवर औषध येत नाही, तोवर काही निष्काळजीपणा नको, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. कोरोना काळात होणाऱ्या या संसदेच्या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. अधिवेशन सुरु होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनावर जगात कुठंही औषधं यावं ही इच्छा आहे. आपले शास्त्रज्ञ देखील यावर प्रयत्न करत आहेत. अधिवेशनाच्या आयोजनाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, खासदारांनी कर्तव्याचा मार्ग अवलंबला आहे. मी सर्व खासदारांचं आभार मानतो. याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेआधी आटोपावं लागलं होतं. यावेळी अधिवेशनात अनेक बदल केले आहेत. मात्र सर्वांनी याचं स्वागत केलं आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, या अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय होतील, अनेक महत्वाच्या चर्चा होतील. लोकसभेत जितक्या महत्वाच्या चर्चा होतील, त्याचा देशाला फायदा होतो. यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करु, असंही ते म्हणाले. देशाच्या सीमेवर आपले जवान मोठ्या हिमतीने आपल्यासाठी तैनात आहेत. जवान दुर्गम भागात, पर्वतांवर, बर्फ पडत असताना आपल्या सुरक्षेसाठी विश्वासानं उभे आहेत. विपरित परिस्थितीत ते देशाची सेवा करत आहेत. या सदनात आम्ही सगळे त्या जवानांच्या पाठिशी ताकतीने उभे आहोत, असा संदेश आम्ही देऊ, असं मोदी म्हणाले. आपण देखील काळजी घ्यावी, बातम्या तर मिळत राहतील, असं मोदी पत्रकारांना म्हणाले.