जळगाव – राज्यात आता विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी प्रश्न विचारले नाही. अर्थहीन मुद्दे काढून जनतेला भ्रमित करण्याचे काम ते करीत आहेत. शेतकऱयांच्या आत्महत्याविषयी जर ते आमच्या सत्ताधाऱ्यांशी भांडले असते तर मी त्यांना अभिमानाने सलाम ठोकला असता, असे रोखठोक प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, खान्देशची मुलुख मैदान तोफ, शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी केले.
एका खाजगी वृत्तवाहिनीला आज सोमवारी पालकमंत्री पाटील यांनी मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. 36 हजार गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. तर 4 हजार गावांमध्ये अद्यापही पाणीपुरवठा नियमित नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे.
करोनाच्या बाबतीत जळगाव मागे का ? या प्रश्नावर ते म्हणाले की,
मृत्यू दर कमी झाला. जनतेने सहकार्य करण्याची खूप आवश्यकता आहे. जिल्ह्यात कायम टाळेबंदी शक्य नाही. जळगावला लॅब नव्हती. ती मंजूर करून आणली. उभारली. 500 ऑक्सिजन बेड आहेत. प्रत्येक तालुक्याला कोविड सेंटर आहे. प्रशासनाने उपाय योजना केल्यात. करत आहे. मात्र आता जनतेने यात उतरले पाहिजे. करोना नियंत्रणासाठीचे नियम पाळले पाहिजे, असे ते म्हणाले.
सर्व लोकप्रतिनिधी यांनी करोनाच्या लढाईसाठी मैदानात उतरले पाहिजे. चिमणराव पाटील यांच्याविषयी बोलण्याचा प्रश्नच नाही. चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहे. चिमणराव आमचे जेष्ठ नेते आहेत.
करोना की कंगना या प्रश्नावर गुलाबराव पाटील संतप्त झाले. शेतकरी हिताचे कामे सरकार करीत आहे, ते भाजपाला पचवले गेले नाही. विरोधकांनी हे पिल्लू सोडले आहे. कंगना कुठे चालली, कुठे बसली हे दाखविण्यात रस असणारी मीडिया भरकटत चालली आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. कंगणाला कोणी पुढे आणले ते शोधले पाहिजे. विरोध कुठल्या पातळीवर जाऊन करायचा हे देखील भाजपाला जमले नाही.
नौदलाच्या अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्ही सहन करायला जन्माला आलेलो नाही. चुकीच्या गोष्टी कराल तर कोण सहन करेल ? गालावर माशी बसली तर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.