जळगाव (प्रतिनिधी)- घरासमोर लावलेले ट्रॅक्टरसह ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार शहरातील हरीविठ्ठल नगरात उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी संदिप सुभाष हटकर (वय-३३) रा. हरीविठ्ठल बस स्टॉप जवळ हे शेती करतात. त्यांच्याकडे शेती कामासाठी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १८ झेड ३४३६) हे त्यांच्या आजोबाच्या नावावर आहे. तर ट्रॉली विना क्रमांकाची आहे. फिर्यादीची आई आजारी असल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून त्या दवाखान्यात होत्या. त्यामुळे शेतीचे व ट्रॅक्टरचे काम बंद होते. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता दवाखान्यातून घरी आले असता त्यांचे १ लाख २० हजार रूपये किंमतीचे ट्रक्टरसह ट्रॉली दिसून आले नाही. त्याच दिवशी त्यांच्या आईचे निधन झाले. आईचे अंत्यविधी आटोपल्यानंतर ट्रक्टरसह ट्रॉलीचा शोधाशोध सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासून बघितले मात्र मिळून आले नाही. ट्रक्टर न मिळाल्याने आज रविवारी रामांनद नगर पोलीस स्टेशन येथे संदिप हटकर यांच्या फिर्यादीवरून रामांनद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.तपस हेड कॉन्स्टेबल विनोद शिंदे करीत आहेत.