मुंबई (वृत्तसंस्था) – गेले काही दिवस थोडी विश्रांती घेतलेला पाऊस वीकएंडला पुन्हा वाजत गाजत हजेरी लावणार आहे. मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार आहे. कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिती जिल्ह्यांत शुक्रवारी जोरदार वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो, अशा अर्थाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्यात आज तुरळक ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाची, विजा चमकण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिली.
पुणे, नाशिकच्या घाटमाथ्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सावध राहा, असं सांगणारा यलो अलर्ट मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना देण्यात आला आहे.
पुणे, नगर आणि पश्चिम महाराष्ट्रात काही दिवस दुपारनंतर जोरदार पाऊस होत होता. थोड्या वेळात सोसाट्याच्या वाऱ्यासब मुसळधार पावसाने पुणेकरांची त्रेधा उडवली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातल्या पावसाचा भीषण अनुभव पुणेकर विसरलेले नाहीत. आता वीकएंडला पुन्हा एकदा हवामान विभागाने विजा आणि वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम घाटात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो.
मुंबईत शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. पण शनिवार-रविवारी जोरदार पाऊस होऊ शकतो. कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढचे काही दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. ढग आलेले असताना आणि विजा चमकत असताना शेतात, वावरात जाण्याचं टाळावं आणि झाडाखाली उभं राहू नये, असा इशारा देण्यात आला आहे.