मुंबई (वृत्तसंस्था) – अमली पदार्थ कनेक्शन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. रियासोबतच न्यायालयाने सर्व सहा आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहे. या सहा आरोपींमध्ये रिय आणि तिचा भाऊ शोविक सोबत दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा, जैद, बासित परिहार यांचा समावेश आहे. आता रियाला 22 सप्टेंबरपर्यंत भायखळा तुरूंगात राहावे लागणार आहे.

अभिनेता सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना आढळलेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीचा सहभाग असल्याच्या संशयावरून एनएसबीने तिला ताब्यात घेतले. खालच्या न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. खालच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रियाची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली. गुरुवारी रिया व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याने सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. रियाने अटकेनंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे.







