पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती जि.जळगांव या बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत दिनांक – १८ सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास पुढील मुदतवाढ मिळणेसाठी प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांनी शासनास सादर केला होता.

कोरोना विषाणू (कोविड-१९) मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी महसूल व वन विभागाच्या दिनांक – ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या आदेशान्वये राज्याच्या लॉकडाऊन कालावधी दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच अद्यापही साथीच्या रोग आटोक्यात येण्यास आणखी अवधी लागणार आहे. या परिस्थितीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही असे प्रस्तावाद्वारे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांच्या कडून शासनास सांगण्यात आले. यावर वरील सर्व बाबी लक्षात घेता बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ देणे योग्य असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्याआधारे महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ कलम १४ (३) शासनास प्राप्त अधिकाराचा वापर करून पारोळा कृषि उपन्न बाजार समिती, जि.जळगांव या बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास दिनांक – १९ सप्टेंबर २०२० पासून पुढील सहा महिने म्हणजेच दिनांक १८ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यास दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागा कडून आदेशाद्वारे शासनाची मान्यता देण्यात आली आहे. या मुदतवाढी बद्दल पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, एरंडोल विधानसभेचे आमदार चिमणराव पाटील यांचे आभार मानले.







