नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारतीय हवाई दलाच्या ताफ़्यात राफेल फायटर विमानांचा समावेश हा संपूर्ण जगासाठी आणि खासकरुन आमच्या सार्वभौमत्वावर नजर ठेवणाऱ्यांसाठी एक मोठा आणि कठोर संदेश आहे’, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिला आहे. ते अंबाला हवाई तळावरील कार्यक्रमात बोलत होते. त्यांचा हा टोला म्हणजे चीनला अप्रत्यक्षपणे इशारा असल्याचे म्हटले जात आहे.

‘सध्या आमच्या सीमेवर जी स्थिती आहे किंवा मी म्हणेन, जी स्थिती निर्माण करण्यात आलीय, त्या पार्श्वभूमीवर राफेलचा इंडियन एअर फोर्समध्ये समावेश खूप महत्त्वाची गोष्ट आहे’ असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. ‘नुकत्याच झालेल्या परदेश दौऱ्यात मी भारताचा दृष्टीकोन जगासमोर मांडला. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी अजिबात तडजोड करणार नाही. भारताचा हा निर्धार असून, त्याची मी कल्पना दिली आहे. सार्वभौमत्वासाठी शक्य ते सर्व करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत’ असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.







