सावखेडा ता.अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चांने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
कोरोनामुळे ग्रामिण भागात रोजंदारी, कामधंदा अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहे. जि.प.शाळेत गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पालकांना आपल्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य घेणे मुश्कील आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन येथील जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने वह्या, सचित्रबालमित्र, पेन असे शैक्षणिक साहित्य दिले. विदयार्थी जेथे असतील तेथे जाऊन तसेच काहींना बोलवून वैयक्तिक अंतर ठेवून साहित्य दिले.
मुख्याध्यापक बाळू पाटील, उपशिक्षिका श्रीमती सुषमा तायडे, श्रीमती वैशाली बोरसे, श्रीमती प्रमिला मोरे यांनी शैक्षणिक साहित्य मोफत दिले. याप्रसंगी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान वैदू हे उपस्थित होते.