जळगाव (विशेष प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा पोलिस दलातील पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे, हे गेल्या तीन महिन्यापासून कोरोना कक्ष जळगाव या ठिकाणी कर्तव्य पार पाडीत आहे. एप्रिल महिन्यात आलेल्या त्यांच्या 21 दिवसाच्या कोरोना कक्षातील अनुभवावर त्यांनी मृत्यू घराचा पहारा या शीर्षकाखाली पुस्तक लिहून काढले प्रकाशकाच्या दाव्यानुसार हे एका कोरोना योद्धयाने लिहिलेले हे देशातील पहिलेच पुस्तक आहे. सदर पुस्तकाला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी प्रस्तावना दिलेली आहे. तर पोलीस अधीक्षक जळगाव पंजाबराव उगले व निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुस्तकाची छपाई होऊन जेव्हा पहिली प्रत प्रकाशकाने विनोद अहिरे यांच्या हातात दिली तेव्हा ती त्यांनी घरी येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून त्यांना अर्पण केली.

पोलिस कर्मचारी विनोद अहिरे यांनी सांगितले की, कोणतेही पुस्तक वाचण्यापूर्वी आधी पुस्तकाचे लेखक बघत असतो कारण पुस्तकांमध्ये लेखकाच्या विचारांचे प्रतिबिंब उमटलेले असते, युवराजजीकडून पंधरा प्रति घेऊन घरी आलो. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा काढून टेबलावर ठेवून दोघे प्रतिमांना सर्वप्रथम अभिवादन करून पुस्तकाची पहिली प्रत अर्पण केली. पुढे म्हणाले की,माझ वैयक्तिक मत आहे की, प्रत्येकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दडलेले आहेत तुमच्यावर कितीही अन्याय झाला तरी तुम्ही ह्या महापुरुषांना त्यांच्या विचारांना तुमच्या आतमध्ये जिवंत ठेवा मग ते तुमच्यामध्ये एका योद्धयाच्या रूपाने असू शकतात..! किंवा विद्रोहाच्या रुपाने असू शकतात..! कवीच्या रूपाने असू शकतात..! वक्त्याच्या रुपाने असू शकतात..! खेळाडूच्या रुपाने असू शकतात..! किंवा साहित्यिकांच्या रूपाने असू शकतात..! आपल्यावर किती मोठे संकट येऊ दे कितीही मोठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ द्या पण या दोघा महापुरुषांना आपल्या हृदयात, आपल्या रक्तात आपल्या विचारात जागते ठेवा..! त्यांच्या विचारांची ज्योत विझू देऊ नका कदाचित हे दोघे महापुरुष माझ्यामध्ये साहित्यिकाचे रूपामध्ये दडलेली असतील म्हणून मी एप्रिल महिन्यात मृत्यूची भीती असून सुद्धा कोरोना कक्षामध्ये बसून मृत्यू घराचा पहारा हे पुस्तक लिहू शकलो याच सर्व श्रेय फक्त आणि फक्त छत्रपती शिवराय आणि भीमरायांनाच जाते. भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा समोर पुस्तकाची प्रत ठेवली त्यानंतर वडिलांना देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. आई लहान भावाकडे गडचिरोली येथे गेल्याने आईला पण व्हिडिओ कॉल करूनच पुस्तकाची प्रत दाखवली. योगायोगाने त्याच दिवशी आमचे मामा मुकुंदराव सपकाळे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या घरी जाऊन त्यांना देखील भेट दिली. तिथे देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा समोर पुस्तक ठेवले. दुसर्या दिवशी मन्यारखेडा आमच्या मूळ गावी आमचे पूर्वज नगाबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना पुस्तकाची प्रत अर्पण केली.येता-येता खेडी माझ्या सासरवाडीला पत्नीला, सासू-सासर्याना पुस्तक भेट दिले त्यानंतर पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांना भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले असल्याने श्री.अहिरे यांनी सांगितले.







