म्हसावद (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील म्हसावद लमांजन परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार असून शेळी व जंगली डुकरांचा त्याने फडशा पाडला आहे. तसेच एका शेतातील सालदारावरसुद्धा हल्ला केला आहे. शेतीबहुल परिसर असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. कारण चाळिसगाव तालुक्यामध्ये बिबट्याने नरभक्ष केल्याचे काही वर्षापुर्वी जिल्ह्यात घडले होते त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नागरिक घाबरत आहे. प्रशासनाने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसावद पासून पाच किलोमीटर अंतरावरील लमांजन – कु-हाळदा शिवारात बिबट्याचे काल संध्याकाळी दर्शन झाले. शिरसोली प्र.न येथील माजी उपसरपंच शेनफडू नामदेव पाटील यांच्या शेतातील कापूस पिकामधून शेजारी असलेल्या शेतकरी निंबा ठाकरे (रा. म्हसावद) यांच्या मक्याच्या शेतामध्ये जातांना लमांजन येथील नाना पाटील यांना बिबट्या दिसला होता. लमांजन उपसरपंच गोरख निंबा पाटील व लमांजन पोलीस पाटील भाऊराव पाटील यांनी वनखात्याच्या अधिका-यांना कळविले.
वनवरक्षकांकडून परिसराची तपासणी
घटनेचे गांभीर्य पाहता तत्काळ वनपाल पी. जे. सोनवणे, वनरक्षक सी. व्हि.पाटील, दिपक पाटील, बी. डी. पवार व वाहन चालक कैलास दुर्गे यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राण्यांचे ठसे बघितले मात्र याठिकाणी बिबट्याचे ठसे मिळाले नाही. मात्र जंगली डुकराचे ठसे मिळून आले. यावेळी शेतकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली मात्र आवश्यक माहिती त्यांच्याकडून वनरक्षकांना मिळत नसल्याने बिबट्याचा शोध व बिबट्या आहे की नाही या निर्णयापर्यंत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पोहचता आले नाही.
वीस दिवसापासून बिबट्याचा कहर
लमांजन म्हसावद शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे अनेकांनी सांगितले. म्हसावद येथील शेतकरी आबा एकनाथ सोनवणे यांचे सालदारवरती बिबट्याने हल्ला केला होता. लमांजन येथील भास्कर शामराव पाटील यांच्या शेळी वरतीसुद्धा बकरी जखमी झाली होती ती बकरी चार दिवसांनी मरण पावली. तसेच काल लमांजन कुऱ्हाळदा शिवारातील मक्याच्या शेतात जंगली डुक्कर ची शिकार केली असल्याचे लमांजन येथील शेतकऱ्यांन मध्ये चर्चा होती. यावरून गेल्या वीस दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीत परिसरातील नागरिक आहेत. त्यामुळे शेतात जाण्यास कोणीही धजावत नसल्याने शेतीचे कामेही खोळंबली आहे ही वस्तुस्थिती असून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी.
अन्यथा चाळीसगाव तालुक्याची पुनरावृत्ती
गेल्या काही दिवसांपूर्वी गिरणा परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत चार महिलांसह तीन मुले अशा एकूण सात जणांचे भक्षण केले होते. यावेळी बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्याच्या शोधासाठी वनविभागाचे कर्मचारी, शार्प शूटर्स, विशेषज्ज्ञ, वन्यप्रेमी यांची दहा पथके तयार केली होती. पिलखोडपासून ते वरखेडे आणि दरेगावपर्यंतच्या परिसरात दहा मानवी मनोरे उभारण्यात आले होते. हैदराबादहून आलेले शार्प शूटर नवाब शफहात अली खान, त्यांचा मुलगा अजगर अली खान, औरंगाबादचे डॉ. साद नक्षबंदी, डॉ. सौद नक्षबंदी यांचे पथक बिबट्याच्या मागावर होते. एका ग्रामस्थावर झडप घालण्याच्या तयारीत असतानाच खान यांनी बिबट्यावर गोळी झाडली. त्यात तो जागीच ठार झाला. अशी पुनरावृत्ती पुन्हा नको यासाठी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी म्हसावद व लमांजन परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
केसरीराजची घेतली दखल
सर्व सामान्यांना न्याय देणारे केसरीराजकडे नागरिकांनी बिबट्या संदर्भातील व्यथा मांडली. वनविभागाकडे केसरीराजने परिस्थितीची माहिती दिली वनविभागातील अधिकाऱ्यांनी दिवसभर लमांजन म्हसावद परिसर पिंजून काढला नागरिकांचाही विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना बिबट्या असल्याचे ठोस असे पुरावे अद्याप मिळाले नसल्याचे वनरक्षक सि. व्ही. पाटील यांनी केसरीराजशी बोलताना सांगितले.







