नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- मोहरम मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मागणाऱ्या याचिकेवर निर्णय देताना आज सर्वोच्च न्यायालयाने, जनतेच्या आरोग्याबद्दल धोका घेऊ शकत नाही, असं सांगत मागणी फेटाळून लावली आहे. यंदा जगभरासह भारतामध्ये देखील कोरोना विषाणू संकटाचे काळे ढग दाटल्याने अनेक सण उत्सव साजरे करण्यावर बंधने आली आहेत. याच पार्श्वभूमीवर मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीलाही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.

दरम्यान, मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका लखनौ येथील याचिककर्त्यांनं केली होती.
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत देशभरात मोहरम मिरवणुका काढण्यास नकार दिला.
न्यायालय म्हणाले, ‘जर आम्ही मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला करोनाचा प्रसार केला म्हणून लक्ष्य केलं जाईल. आम्हाला ते नको आहे,’
‘न्यायालय म्हणून आम्ही जनतेच्या आरोग्याबद्दल धोका पत्करू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी मिरवणूक काढण्याची मागणी केली, तर आम्ही उद्भभवणाऱ्या धोक्याचा विचार केला असता,’ न्यायालयानं सांगितलं.
त्यावर ‘शिया समुदायातील बहुसंख्य लोक लखनौमध्ये वास्तव्याला आहेत, त्यामुळे केवळ लखनौसाठी परवानगी मिळेल का,’ अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. याप्रकरणी न्यायालयानं अलहाबाद न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. या प्रकरणामध्ये राज्यांनीही कोणतीही भूमिका घेतली नसल्याचं न्यायालयानं लक्षात घेतलं.







