नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सोमवारीही सुधारणा झालेली नाही आणि ते अद्यापही ते दीर्घ कोमात आहेत. दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटललने याबाबत माहिती दिली आहे.
84 वर्षीय मुखर्जीवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगतिले की, ते अजूनही कोमातच असून त्यांच्यावर श्वसन संसर्गावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे त्यांना अद्यापही व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आलेले आहे. तसेच प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीबाबतचे सर्व महत्वाचे वैद्यकीय मापदंड स्थिर असल्याचेही रुग्णालयाने म्हटले आहे.
राजाजी मार्ग येथील घरी घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे 84 वर्षीय मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाली होती. ही गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर मेंदू शस्त्रक्रियाही करण्यात आली. आज 14 दिवस उलटून गेले तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसून अजूनही त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरच ठेवण्यात आले आहे.
21 ऑगस्ट रोजी माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट करुन वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. तसेच मुखर्जी यांच्या प्रकृतीच्या सुधारणेसाठी सर्वांनी दिलेल्या सदिच्छा आणि प्रार्थनेसाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती.