जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणने वीज ग्राहकांना पाठवलेल्या वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’ राजकीय नेत्यांना सुद्धा बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरातील घराचे वीजबिल भरमसाठ आले आहे. लॉकडाऊन काळात एकनाथ खडसे यांना 1 लाख चार हजाराचे बिल आल्याने, त्यांनी रोष व्यक्त केला आहे. राज्य सरकारने याप्रकरणी चौकशी करावी तसंच बिलात सूट दिली गेली पाहिजे अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली आहे.

एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “लॉकडाउनच्या या काळात येणारी वीज बिलं अवास्तव असून ती न भरण्यासारखी आहेत. महावितरणने अशा पद्दतीने लोकांना वेठीस धरु नये”. “सरकारने अवास्तव बिलांची चौकशी केली पाहिजे. तसंच बिलामध्ये सवलत दिली पाहिजे,” अशी मागणी एकनाथ खडसे यांनी यावेळी केली आहे.
लॉकडाननंतर आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे आदेश आपण देऊ शकत नाही, असं उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केलं. तसंच ग्राहकांनी याप्रकरणी तक्रार निवारण मंचाकडे दाद मागण्याच्या आपल्या निर्देशांचा पुनरूच्चार केला. ग्राहकांच्या तक्रारींवर विलंब न करता तातडीने निर्णय देण्याचं आदेशही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने वीज नियामक मंडळ तसेच वीजपुरवठादार कंपन्यांना दिले.







