नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसनचा एक फोटो चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोमध्ये पीएम जॉनसन मेड इन इंडिया सायकल चालवताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते ब्रिटनमध्ये डिझाइन ही सायकल चालवून जीबीपी 2 बिलीयन सायकलिंग आणि वॉकिंग ड्राइव्ह लॉन्च करण्यासाठी पोहोचले. सरकारची ही योजना कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आणि लठ्ठपणाविरोधी रणनीतीचा एक भाग आहे.

56 वर्षीय जॉन्सन यांना सायकल चालवण्याची आवड आहे. मंगळवारी ते मध्य इंग्लंडमधील नॉटिंघम हेरिटेज सेंटरमध्ये मेड इन इंडिया सायकल चालवताना दिसले. यावेळी त्यांनी नवीन फिटनेस धोरणाचा भाग म्हणून हजारो मैलांची नवीन संरक्षित दुचाकी लेन आणि सायकल प्रशिक्षण देण्याची योजना सुरू केली.
लोकांना फिट आणि निरोगी ठेवण्यात सायकलची भूमिका महत्त्वाची
दरम्यान कोरोनाला मात देणारे जॉन्सन म्हणाले की, लोकांना आपले शरीर तंदुरुस्त ठेवणे, निरोगी ठेवणे, रोगाचा धोका कमी करणे, हवेची गुणवत्ता सुधारणे आणि गर्दी कमी करणे यासह आपल्यासमोर असलेल्या काही सर्वात मोठे आरोग्य आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करताना सायकल चालविणे आणि चालणे खूप मोठी भूमिका बजावते. ते म्हणाले की, निरोगी राष्ट्र निर्माण करण्यासाठी लोकांनी सायकलवरून प्रवास केला पाहिजे. यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि समर्थन आवश्यक आहे. जेणेकरून सायकलचा फायदा प्रत्येकाला जाणवेल.







