पुणे (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी कॉंग्रेस , कॉंग्रेस आणि शिवेसेना यांनी केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन नुकतेच शंभर दिवस पार पडले आहेत. सरकार स्थापन होताच हे सरकार किती दिवस टिकेल असे प्रश्न आणि चर्चा सर्वत्र पसरले होते. परंतु आता हे सरकार योग्य रुळावर आल्याचे पाहायला मिळत होते.
त्यातच आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे ते म्हणाले की, राज्यात आम्ही सत्तेत आहोत, मात्र आमचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेवर कुरघोड्या सुरु केल्या आहेत. यामुळेचं पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मरगळ आलेली आहे, असे ते म्हणाले आहेत.
यामुळे आता आगामी काळामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटलांना कशा प्रकारचे प्रतिउत्तर मिळतय हे पाहणे उत्सुकतेचे आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळेला शिवसेनेचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र, यंद्याच्या (२०१९) लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव यांचा पराभव करीत या जागेवर राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. दरम्यान, लोकसभेच्या प्रचारादरम्यान आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर टीका करताना त्यांच्या जातीचा उल्लेख केल्याने मोठी चर्चा झाली होती. शिवसेनेकडून नुकतीच राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांची उमदेवारी जाहीर झाली. यासाठी आढळराव पाटील यांची वर्णी लागेल असं बोललं जात होतं. मात्र, शिवसेनेने त्यांना डावललं. यावर पक्षप्रमुखांचा निर्णय योग्य असल्याचे जरी आढळराव सांगत असले तरी त्यांनी शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला असल्याचे पाहायला मिळत आहे.