श्रीनगर (वृत्तसंस्था) –करोना संकटामुळे यंदाची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्याबाबतचा निर्णय श्री अमरनाथ देवस्थान मंडळाच्या येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. करोना फैलावामुळे जम्मू-काश्मीरातील धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. आता दक्षिण काश्मीरमध्ये 3 हजार 880 मीटर उंचावर वसलेल्या पवित्र गुंफेची यात्राही रद्द करण्यात आली आहे.

व्यापक जनहित विचारात घेऊन जड अंत:करणाने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाने स्पष्ट केले. अर्थात, भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून पवित्र गुंफेचे व्हर्च्युअल दर्शन घडवले जाणार आहे.
त्याशिवाय, सकाळ आणि सायंकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. मंडळाच्या निर्णयामुळे अमरनाथ यात्रेविषयी निर्माण झालेला संभ्रम संपुष्टात आला आहे.







