नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या देशभरातील वाढत्या दुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक महत्वाच्या क्रीडा स्पर्धांवर संकट ओढावले आहे. कोरोनामुळे २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेवरही गंडांतर आले आहे. आयपीएलचे सामने पुढे ढकलावेत यासाठी अनेक राज्य सरकार केंद्राला विनंती करत असतानाच आयपीएल सामने न खेळवण्याचा निर्णय दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने घेतला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी दिली.
आतापर्यंत सहा लोकांना दिल्लीत कोरोनाची लागण झालेली आहे. या सहा लोकांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर दिल्लीतील सिनेमागृहही ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होते आहे. सलामीचा सामना गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगणार आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआय सर्व सामने प्रेक्षकांविना खेळवण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती सुत्रांकडून मिळत आहे. शनिवारी आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होणार आहे, ज्यात आयपीएलच्या भवितव्याबद्दल निर्णय घेतला जाईल.