पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात पप्पू पडवळ उर्फ घनश्याम पडवळ या गुंडाची हत्या ( करण्यात आली. एका सराईत गुन्हेगाराची त्याच्याच घरात घुसून हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी मुळशी पॅटर्न सिनेमाप्रमाणे कोयत्याने वार करुन क्रूरपणे हत्या केली.
पप्पू पडवळ हिस्टरीशीटर होता, त्याच्याविरोधात पोलिसांनी अनेक गुन्ह्यांची नोंद केली होती. एक कारचालक ते सराईत गुन्हेगार असा प्रवास करणाऱ्या पप्पूची हत्या करण्याचा आधीही एक प्रयत्न झाला होता.
व्याजावर पैसे देणारा पप्पू कोरोना संकट सुरू झाल्यामुळे घरातच होता. घरात एकटाच असलेल्या पप्पूवर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला. त्यांनी काही तरी चौकशी करण्याच्या निमित्ताने घरात प्रवेश मिळवला. नंतर कोयत्याने पप्पूवर वार केले. ही घटना ब्रह्मा इमेराल्ड कंट्री सोसायटीत इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील पप्पूच्या घरात घडली. पप्पूचा चेहरा कोयत्याचे वार झाल्यामुळे ओळखू येत नव्हता. त्याचे शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पप्पूची हत्या करुन मारेकरी पळून गेले.
पप्पूच्या शरीरावर कोयत्याचे वार होते. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात पप्पूचा एक हात तुटून शरीरापासून वेगळा झाला. हल्लेखोर किती जण होते आणि त्यांनी कोणत्यावेळी हल्ला केला याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पोलिसांनी पप्पूचा मृतदेह पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. फॉरेन्सिक टीमनेही काही नमुने गोळा केले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल आल्यावर तपासकामाला दिशा मिळण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी पप्पूच्या शेजाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.
पप्पू पडवळला होते सोन्याचे वेड
पप्पू पडवळला सोन्याचे वेड होते. तो अनेक सोन्याचे अवजड दागिने घालून सार्वजनिक ठिकाणी मिरवणे पसंत करायचा. त्यामुळे सोन्यासाठी हत्या झाली की गुन्हेगारांच्या संघर्षातून ही हत्या झाली याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.