धुळे (वृत्तसंस्था) – लळींग कुरणातील धबधबा व डोहात मृत्यू झालेले मयत युवक रोहित गिरासे, शुभम पाटील, शुभम गिरासे यांच्या परिवाराच्या दुखा:त मी सहभागी आहे. लळींग कुरणातील डोहात बडून मृत्यू होणे ही घटना मनाला चटका लावून जाणारी दुर्दैवी अशी घटना आहे अशी भावना व्यक्त करत धुळे शहराचे आमदार डॉ. फारूक शाह यांनी लळींग कुरणातील धबधबा व डोहाची वन अधिकारी व कर्मचारी यांच्यासह पाहणी केली व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी लळिंग कुरण व परिसरात काही बदल करणे अपेक्षीत आहे. यावेळी याठिकाणी अनेकदा धुळे शहर – मालेगाव व तालुक्यातील पर्यटकांचा जास्त करून युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू होत असतो. निदान आता या घटनेनंतर तरी लळिंग कुरण व परिसरात काही बदल करणे गरजेचे आहे. त्यात सर्वप्रथम डोहाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील रेलिंग पूर्णतः बंद केली पाहिजे व स्पष्ट सूचना फलक देखील लावले पाहिजेत, रेलिंगची उंची वाढवून जाळी लावणे गरजेचे आहे, कुरणात पर्यटकांसाठी येणाऱ्यासाठी एक विशिष्ट दिवस व वेळ निर्धारित केली पाहिजे. शिवाय वनविभागाने गस्तीसाठी वाढीव बंदोबस्त ठेवत प्रवेश करतांनाच आधार कार्ड व ओळखपत्र तपासले पाहिजे तसेच वन भागातील कुरणात व परिसरात ये-जा करणाऱ्यांची नोंद घेतली गेली पाहिजे या शिवाय पर्यटकांना परवानगी व समंती पत्र देऊनच परिसरात जाण्याची परवानगी दिली पाहिजे याठिकाणी येणारे सर्व छुपे व आड रस्ते बंद करून खास करून पावसाळ्याच्या दिवसात याठिकाणी पोलिस व वनविभागाची गस्तही व्हायला पाहिजे त्यामुळे कुणी डोहाच्या दिशेने जाणार नाही व असे अपघात घडणार नाही. मोबाईलला संपर्क करण्यासाठी याठिकाणी रेंज नसते म्हणून या कुरणात किंवा योग्य त्याठिकाणी मोबाईल टॉवरची उभारणी करणे देखील गरजेचे आहे. या सर्व सूचनांचा व आपणांस लागणाऱ्या मदतीचा आपण ताबडतोब प्रस्ताव तयार करा व पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या असे निर्देश आमदार फारूक शाह यांनी लळींग कुरणासह, तेथील धबधबा व डोहाची पाहणी करतांना वन प्रशासनाला दिल्या.
पाहणी प्रसंगी शहराचे आमदार डॉ. फारूक शाह यांच्यासह, वन परीक्षेत्र अधिकारी महेश पाटील, वनपाल भाऊसाहेब जाधव, आलीम कलीम शाह, युसुफ पिंजारी, निलेश काटे यांच्यासह वनपरीक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









