मॉस्को (वृत्तसंस्था) – दुसऱ्या महायुद्धाच्या ७५व्या विजय दिना निमित्त रशियात (Russia) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे मॉस्को येथे दाखल झाले होते. या विजय दिन कार्यक्रमात सहभागी होत राजनाथ सिंह यांनी या सोहळ्यातील काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. मॉस्कोतील (Moscow) रेड स्केअर चौक येथे झालेल्या भव्य परेड सोहळ्यात रशियासह इतरही अनेक देशांतील सैन्य दलाने (Indian Army) सहभाग घेतला. भारताच्या तिन्ही दलाच्या सैन्यानेही या पथसंचलना कार्यक्रमात सहभाग घेतला. या सोहळ्याचे काही फोटोज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट केले आहेत. हे ट्वीट करताना राजनाथ सिंह म्हणाले, “भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही तुकड्यांना एकत्र पथसंचलन करताना पाहून मला खूपच अभिमान वाटत आहे”. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे रशियाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात राजनाथ सिंह यांनी संरक्षण कराराच्या संदर्भात रशियासोबत चर्चा केली आहे.

मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे उप पंतप्रधान युरी इवानोविच बोरिसोव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी रशियासोबत भारताच्या संरक्षण करारावर चर्चा केली. यावेळी रशियाने भारताला आश्वासन दिले की, त्यांच्याकडून संरक्षण कराराची योग्य अंमलबजावणी होईल. बोरिसोव्ह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह म्हणाले, “भारताने सादर केलेल्या नवीन संरक्षण कराराच्या प्रस्तावाला रशियाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे”.







