
महादेव रुग्णालयात आर्थ्रोस्कोपी पद्धतीने रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रिया
जळगाव : अपघातामुळे गुडघ्याला गंभीर दुखापत होऊन एसीएल (अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट) आणि पीसीएल (पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट) ही दोन्ही महत्त्वाची लिगामेंट फाटलेल्या २७ वर्षीय तरुणीवर महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने आर्थ्रोस्कोपी पद्धतीने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
याबाबत माहिती अशी की, संबंधित तरुणीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. गुडघ्यात तीव्र वेदना जाणवत होत्या, तसेच पायाची हालचाल करताना आणि चालताना अडचणी निर्माण होत होत्या. सुरुवातीला दुखापत सामान्य स्वरूपाची असावी, असे वाटत असले तरी वेदना आणि हालचालींमधील अडथळे कायम राहिल्याने तिने वैद्यकीय उपचार घेतले.महादेव रुग्णालयातील अस्थिरोग विभागातील डॉ. नरेंद्र शिरसाठ, डॉ. मनीष चौधरी यांनी तपासणी केल्यानंतर एमआरआय करण्याचा सल्ला दिला. एमआरआय अहवालातून गुडघ्याला स्थिरता देणार्या एसीएल आणि पीसीएल या दोन्ही महत्त्वाच्या लिगामेंटला गंभीर दुखापत होऊन ती फाटल्याचे (एसीएल व पीसीएल टिअर) निदर्शनास आले. ही दुखापत गुडघ्याच्या स्थिरतेवर परिणाम करणारी असल्याने योग्य वेळी शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते.त्यानुसार अस्थिरोग विभागाचे तज्ज्ञांनी आर्थ्रोस्कोपी पद्धतीने एसीएल आणि पीसीएल रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या आधुनिक पद्धतीमध्ये गुडघ्यावर मोठा छेद न घेता छोट्या छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष शस्त्रक्रिया उपकरणांच्या साहाय्याने उपचार केले जातात. कॅमेर्याच्या माध्यमातून गुडघ्याच्या आतील भागाचे बारकाईने निरीक्षण करून खराब झालेल्या लिगामेंटच्या जागी नवीन लिगामेंटची पुनर्रचना केली जाते. या तंत्रामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करण्यास मदत होते.
शस्त्रक्रियेनंतर तरूणीची प्रकृती पूर्ववत
महादेव रुग्णालयातील अस्थिरोग विभागाचे तज्ज्ञ डॉ. नरेंद्र शिरसाठ, डॉ. मनीष चौधरी, डॉ. विरेंद्र पाटील, डॉ. नचिकेत झगडे, डॉ. देवेंद्र पाटील यांच्या टीमने नियोजनबद्ध पद्धतीने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर तरुणीची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रियेसाठी भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. रघुनाथ बर्हाटे, डॉ. विदीशा, डॉ. सुश्रिता यांनी सहकार्य केले. गुडघ्याची हालचाल पूर्ववत होण्यासाठी आणि स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी फिजिओथेरपी केली जात आहे.

अपघात किंवा खेळताना झालेल्या दुखापतीमुळे या लिगामेंट फाटल्यास गुडघा अस्थिर होणे, चालताना त्रास होणे तसेच दैनंदिन हालचालींवर मर्यादा येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अशा दुखापतींकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. एमआरआय तपासणीमुळे दुखापतीचे नेमके स्वरूप समजण्यास मदत होते. योग्य रुग्णामध्ये आर्थ्रोस्कोपीद्वारे लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन केल्यास गुडघ्याची स्थिरता सुधारण्यास मदत होते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर नियमित फिजिओथेरपी आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
– डॉ. विरेंद्र पाटील, महादेव रूग्णालय, जळगाव.








