
आमदार अमोल जावळे यांचा रात्रीपासून पहाटेपर्यंत पाठपुरावा; मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तक्षेपाने प्रश्न मार्गी
यावल (प्रतिनिधी) : संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी किती तत्परतेने मदतीला धावून येतात, याचा प्रत्यय यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील एका घटनेतून आला. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालेल्या संजय मुरलीधर पाटील (वय ५३) यांचा मृतदेह थकीत रुग्णालयीन बिलाच्या कारणामुळे कुटुंबीयांना मिळण्यात अडचण निर्माण झाली होती. मात्र, आमदार अमोल जावळे यांनी मध्यरात्रीपासून केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तक्षेपामुळे अखेर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

टाकरखेडा येथील रहिवासी संजय मुरलीधर पाटील यांचे २६ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथील ग्लेनीगल्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची (लिव्हर ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया करण्यात आली होती. टाटा ट्रस्टच्या मदतीने तसेच कुटुंबीयांनी स्वतःच्या खर्चातून त्यांच्या उपचारांसाठी आतापर्यंत सुमारे २५ ते २७ लाख रुपये खर्च केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
मात्र, संजय पाटील यांच्या निधनानंतर रुग्णालय प्रशासनाकडून उर्वरित ४ लाख ९९ हजार ६४५ रुपयांची थकबाकी भरण्याबाबत सांगण्यात आल्याने मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रश्न निर्माण झाला. आधीच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आर्थिक अडचणीमुळे नातेवाईकांची मोठी कोंडी झाली होती.
या गंभीर परिस्थितीत नातेवाईकांनी रात्री १० वाजता आमदार अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आमदार जावळे यांनी तातडीने संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. रात्री १० वाजल्यापासून पहाटे १.३० वाजेपर्यंत त्यांनी आरोग्य विभागातील विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करून सातत्याने पाठपुरावा केला. एवढेच नव्हे, तर पहाटे ५ वाजताही त्यांनी पुन्हा फोन करून परिस्थितीची माहिती घेतली.
यानंतर आमदार अमोल जावळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिले. महाजन यांनीही तातडीने रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधत या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रुग्णालय प्रशासनाने संजय पाटील यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
मध्यरात्री आलेल्या एका फोनपासून सुरू झालेला हा पाठपुरावा अखेर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात मिळाल्यानंतर संपला. दुःखाच्या प्रसंगी मदतीचा हात देत आमदार अमोल जावळे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पाटील कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता या घटनेतून अधोरेखित झाली.






