
लग्नाचा बस्ता घेण्यासाठी जळगावकडे निघाले होते रायसिंगे कुटुंब; टायर फुटल्याने कार पलटी
यावल ( प्रतिनिधी ) : – चोपडा तालुक्यातील अडावद येथून नातेवाइकांच्या मुलाच्या लग्नाचा बस्ता घेण्यासाठी जळगावकडे निघालेल्या रायसिंगे कुटुंबाच्या कारला भीषण अपघात झाला. अडावद रोडवरील चेरी फॅक्टरी परिसरात कारचे पुढील टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्त्यावर पलटी झाली. या दुर्घटनेत बवनबाई भगवान रायसिंगे (वय ६५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, रायसिंगे कुटुंबीय लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी सकाळी कारने जळगावच्या दिशेने रवाना झाले होते. प्रवासादरम्यान चेरी फॅक्टरी परिसरात कारचे पुढील टायर अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्यावर उलटली. या अपघातात कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या.या दुर्घटनेत बवनबाई भगवान रायसिंगे यांचा मृत्यू झाला. तर कैलास शिवा रायसिंगे, पुंडलिक शिवा रायसिंगे, दिनेश पुंडलिक रायसिंगे, रेखा पुंडलिक रायसिंगे यांच्यासह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.लग्नाच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने अडावद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघाताची संबंधित पोलीस ठाण्यात अद्याप नोंद झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.









