
पाच क्विंटल कापूस चोरीप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई; १ क्विंटल २० किलो कापूस हस्तगत
लोहारा, ता. पाचोरा (प्रतिनिधी) : कळमसरा येथील शेतातील गोडाऊनमधून पाच क्विंटल कापूस चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक क्विंटल २० किलो कापूस हस्तगत करण्यात आला आहे. अटक केलेल्या पहिल्या दोन आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कळमसरा येथील शेतकरी पवन राजू माळी यांच्या कुंभारखाण शिवारातील गट क्रमांक ६५०/१ मध्ये शेतातील गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये ठेवलेला पाच क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार त्यांनी २४ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२०/२०२६, कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी संशयावरून श्रावण शांताराम न्हावी (रा. कळमसरा, ता. पाचोरा) आणि विजय बाळू सोनवणे (रा. मालखेडा, ता. जामनेर) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
लपवून ठेवलेला कापूस पोलिसांनी केला हस्तगत
श्रावण न्हावी याने स्वतःच्या शेतातील कडबा कुट्टीमध्ये लपवून ठेवलेले कापसाचे गाठोडे, तर विजय सोनवणे याने शेजारच्या शेतातील केळीच्या बागेत लपवून ठेवलेले कापसाचे गाठोडे पोलिसांना काढून दिले. त्यांच्याकडून एकूण एक क्विंटल २० किलो कापूस हस्तगत करण्यात आला.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपासात हितेश साहेबराव सोनवणे (रा. मालखेडा, ता. जामनेर) याचाही चोरीच्या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला दुसऱ्या दिवशी सायंकाळी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांच्या पथकाची कामगिरी
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोलीस हेडकॉन्स्टेबल तात्याबा नागरे, शांतीलाल पगारे आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश भिलखेडे यांच्या पथकाने केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तात्याबा नागरे करीत आहेत.









