
एक आरोपी जेरबंद, चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि टीव्ही हस्तगत; अन्य दोघांचा शोध सुरू
जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात शक्तीसिंग उर्फ हग्गु जीवनसिंग जुन्नी याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि सॅमसंग कंपनीचा ४३ इंची टीव्ही असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी
शामनगर परिसरातील रहिवासी किरण नंदकिशोर वासेवाय हे १२ नोव्हेंबर २०२६ रोजी कुटुंबासह पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. १५ नोव्हेंबर रोजी घरी परतल्यानंतर त्यांच्या घराच्या दरवाजाचा कुलूप-कोंडा तोडलेला असल्याचे दिसून आले.
घरातील कपाटाची पाहणी केली असता सोन्या-चांदीचे दागिने, ४३ इंची टीव्ही आणि १२ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी राजीव गांधी नगर परिसरातील शक्तीसिंग उर्फ हग्गु जीवनसिंग जुन्नी याच्यासह अन्य दोघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न केले.
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे यांना संशयित हग्गुसिंग हा जळगाव रेल्वे स्थानकावरून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे व त्यांच्या पथकाने रेल्वे स्थानकावर धाव घेत त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत साथीदारांची नावे समोर
पोलिसांनी केलेल्या चौकशीत अटक आरोपीने सुबेरसिंग राजुसिंग टाक आणि शेरुसिंग सोजीतसिंग भोंड (दोघेही रा. आत्महत्या कॉलनी, जळगाव) यांच्या साथीने घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सोन्या-चांदीचे दागिने आणि टीव्ही जप्त
पोलिसांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालात सोन्याच्या ५ ग्रॅम व १ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप, १ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुली, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचा गोफ, ब्रेसलेट, तोरड्या, देव, कडे, फुलपात्र तसेच सॅमसंग कंपनीचा ४३ इंची टीव्ही यांचा समावेश आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, पोलीस नाईक योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल सुमेध इंधाटे, मुकुंद गवते, मनोज मराठे, सागर नन्नवरे, जुलालसिंग परदेशी आणि मोतीलाल चौधरी यांनी सहभाग घेतला.
रामानंदनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, फरार असलेल्या अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे.








