
नागपूर, गडचिरोली, नाशिक, जळगावसह धुळे, नंदुरबारमध्ये होणार कार्यालये
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
जळगाव ( प्रतिनिधी ) – महसूल विभागातील कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी होणारी नागरिकांची धावपळ कमी व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ९ नवीन अपर तहसिलदार कार्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाला अंतिम स्वरुप दिले असून, नागपूर आणि नाशिक विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये ही ९ नवीन अपर तहसिलदार कार्यालये करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला.


नागपूर विभागातील सावनेर तालुक्यासाठी मौजे चिचोली (खापरखेडा) आणि गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यातील आष्टी येथे नवीन कार्यालये उभी राहणार आहेत. नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे तहसीलदार कार्यालय होणार आहे. तर जळगाव जिल्ह्यात जळगाव (शहर), जामनेर तालुक्यातील पहूर आणि चाळीसगाव अशी तीन नवीन कार्यालये होतील. तसेच नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार व शहादा आणि धुळे जिल्ह्यात शिरपूर (शहर) येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित केली जाणार आहेत.
या नव्या कार्यालयांमुळे जमिनीशी संबंधित महसूली कामांसाठी लोकांना लांबचा प्रवास करावा लागणार नाही. त्यांना नेमून दिलेल्या भागातील महसूली अधिकार व कामे तिथेच मिळतील. मात्र निवडणूक, संजय गांधी निराधार योजना किंवा इतर महसूली नसलेली कामे मूळ तहसिलदार कार्यालयामार्फतच चालतील. तशी अर्ज किंवा निवेदने नव्या कार्यालयात आल्यास ती पुढील कार्यवाहीसाठी मूळ तहसिलदार कार्यालयाकडे पाठवली जातील.
—
गतिमान प्रशासनासाठी राज्यातील विविध भागांत नव्या अपर तहसिलदार कार्यालयांची उभारणी व प्रत्यक्ष कामकाजाची प्रक्रिया वेगाने पुढे नेण्यात येत आहे. या निर्णयामुळे जमिनीशी व महसुलाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी कराव्या लागणाऱ्या हेलपाट्यांना आळा बसेल आणि त्यांना आपल्या भागातच जलद व पारदर्शक सेवा मिळू शकतील.”
* चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री








