
चोपडा तालुक्यातील मालापूर येथील महिला शिक्षिकेला गंडा; नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत वेळोवेळी घेतली रक्कम
चोपडा : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका महिला शिक्षिकेची तब्बल ३ लाख ८७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार चोपडा तालुक्यातील मालापूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, विद्या विश्वास बाविस्कर (वय ३२, व्यवसाय शिक्षण, रा. गुरुकुल नगर, चोपडा) या मालापूर येथील उच्च प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
आरोपींनी संगनमत करून त्यांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी व त्यांच्या वडिलांकडून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी रोख रक्कम घेण्यात आली. मात्र, नोकरी न लावता घेतलेली रक्कम परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
या प्रकरणी गोपाल दाभाडे, प्रकाश चव्हाण आणि गोरख बोरेसे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या तक्रारीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहित मोरे करीत आहेत. पोलीस नोंदीनुसार, आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.








