
धुळे पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई; चारचाकी वाहनातून तलवार, चॉपर, लोखंडी कट्टे, मिरची पावडरसह ८ हजार ३०० रुपये जप्त
धुळे : जिल्ह्यात गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी धुळे पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेदरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला शस्त्रांसह जेरबंद करण्यात मोहाडी नगर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.


पोलीस अधीक्षक श्रीकांतसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबविण्यात येत आहे. दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजेच्या सुमारास मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील व त्यांच्या पथकाचे कर्मचारी राष्ट्रीय महामार्गावरील सुभाषचंद्र पेट्रोल पंपालगत असलेल्या रानमळा रस्त्याने गस्त घालत होते.
यावेळी पोलिसांना एक चारचाकी वाहन संशयास्पद स्थितीत दिसून आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता वाहनचालकाने वाहन भरधाव वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पथकाने वाहनाचा पाठलाग करून वाहनातील व्यक्तींची तपासणी केली असता त्यांच्याकडे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने विविध शस्त्रे आणि साहित्य आढळून आले.
या कारवाईत हमीद अब्दुल रशीद अन्सारी (वय ३३, रा. चांदतारा चौक, मोलीवगंज, धुळे), शकील शेख करीम शेख (वय ४५, रा. बाबानगर, नटराज टॉकीजसमोर, धुळे), समीर शाह जाकीर शाह (वय २०, रा. अंबिकानगर, फारूक किराणा जवळ, धुळे), तसेच अन्य दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी एका संशयिताचे नाव जुबेर अन्सारी (रा. ताशा गल्ली, गट नं. ५, धुळे) असे नमूद आहे.
पोलिसांनी वाहनातून नायलॉन दोर, मिरची पावडर, लोखंडी टमी, मोठे लोखंडी कटर, लहान रेडियम कटर, स्क्रू ड्रायव्हर, हातोडी, पकड, फोर-वे स्पॅनर, धारदार चॉपर, चार मोबाईल फोन, फास्टॅग कार्ड आणि ८ हजार ३०० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) अन्वये दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद बागल व पोलीस कर्मचारी संदीप कदम पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, ऑपरेशन ऑल आऊटअंतर्गत धुळे जिल्हा पोलिसांनी व्यापक कारवाई केली असून वाहन कायद्यांतर्गत ५९ केसेस, अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी १८ कारवाया, जुगारविरोधी ६ कारवाया आणि एमपीडीए कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. तसेच हॉटेल, बार, ढाबे आणि लॉजची तपासणी करून फरार आरोपींचा शोध घेण्यात आला आहे.
या धडक कारवाईमुळे दरोडेखोरांच्या टोळीला मोठा दणका बसला असून ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेत धुळे पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात आपली कारवाई अधिक तीव्र केल्याचे दिसून येत आहे.








