
विद्यार्थ्यांना हॅकेथॉन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि करिअर विकासासाठी मिळणार विशेष मार्गदर्शन
जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव आणि TenAI’s Consulting India Pvt. Ltd. यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हॅकेथॉन स्पर्धा तसेच करिअर विकासाच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.


या सामंजस्य करारांतर्गत विद्यार्थ्यांना Hackathon India, अविष्कार तसेच राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध हॅकेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सरावाची संधी मिळणार आहे. तसेच प्रगत सॉफ्टवेअरच्या साहाय्याने ATS (Applicant Tracking System) आधारित प्रभावी बायोडाटा (CV) तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक शिक्षण व करिअर मार्गदर्शन, त्यांच्या कौशल्यांनुसार योग्य करिअर पर्यायांची निवड तसेच विविध कंपन्यांच्या अधिकृत करिअर पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या नोकरी व इंटर्नशिपच्या संधींची त्वरित माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
याप्रसंगी TenAI’s Consulting India Pvt. Ltd. चे संचालक श्री. राजेंद्र सोनवणे यांनी या सामंजस्य कराराचे महत्त्व विशद करताना सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्यातील कौशल्ये राष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची संधी मिळेल. त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच उद्योगक्षेत्राच्या अपेक्षांनुसार स्वतःला तयार करण्यास मदत होईल.
या सामंजस्य करारप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, एआयडीएस विभागप्रमुख डॉ. अनिल विश्वकर्मा, ई अँड टीसी विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे, प्रा. निलेश वाणी, हॅकेथॉन व IIC समन्वयक डॉ. अतुल बऱ्हाटे उपस्थित होते. तसेच TenAI’s च्या मार्केटिंग प्रमुख कु. स्वरदा ओगले आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर आर्यन यांची उपस्थिती होती.
या सामंजस्य करारामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, स्पर्धात्मक कौशल्ये आणि रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
सदर सामंजस्य कराराबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. वैभव पाटील सर (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील सर यांनी कौतुक केले.








