जादा बसफेऱ्यांचे नियोजन यशस्वी; तीन दिवसांत ७८ हजार १२९ किलोमीटरची वाहतूक
यावल (प्रतिनिधी) : दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढलेली गर्दी आणि वाहतुकीचे आव्हान लक्षात घेऊन यावल एसटी आगाराने प्रभावी नियोजन करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. दिवाळीच्या हंगामात एका दिवसात तब्बल १७ लाख ५८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आगाराने लक्षवेधी कामगिरी केली आहे.

सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगाराने जादा बसगाड्यांचे नियोजन केले होते. या नियोजनामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अधिक सुविधा उपलब्ध झाल्या. तीन दिवसांत आगाराने तब्बल ७८ हजार १२९ किलोमीटरची वाहतूक केली. आगाराच्या या कामगिरीत चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि योग्य वाहतूक नियोजन यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. दिवाळीच्या गर्दीचे नियोजन यशस्वीपणे हाताळत यावल आगाराने आपली कार्यक्षमता सिद्ध केली असून या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.








